डॉ. वसंत भोसले; सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त व्याख्यान
कराड/प्रतिनिधी : –
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या भागात सहकाराची बीजे रोवली गेली. तर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी आपल्या अथक परिश्रमातून कृष्णाकाठावर सहकार वाढवला आणि या परिसरात समृद्धी आणली, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले यांनी केले.
व्याख्यान : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘आजचा महाराष्ट्र ‘ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
समाजाच्या उभारणीसाठी शाश्वत मूल्ये : सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी समाजाच्या उभारणीसाठी शाश्वत मूल्ये दिल्याचे सांगत डॉ. भोसले पुढे म्हणाले, म्हणूनच अशा थोर नेत्यांची जयंती साजरी केली जाते. आप्पासाहेब यांनी कृष्णाकाठावर सर्वोत्तम अशा संस्था उभारल्या. आज कृष्णा कारखाना आणि कृष्णा उद्योग समूह म्हटले की अभिमान वाटतो.
कृष्णा हॉस्पिटल कराडची ओळख : महाराष्ट्रात पहिल्या पाच कारखान्यांपैकी कृष्णा कारखाना आहे. विकासाचे ध्येय घेऊन आप्पासाहेब यांनी काम केल्याचे सांगताना डॉ. भोसले म्हणाले, समृद्ध झालेला परिसर पाहिल्यावर खूप आनंद झाला. कराडची ओळख म्हणून कृष्णा हॉस्पिटलला ओळखले जाते. इथे उत्तम रुग्णसेवा दिली जाते. त्याचबरोबर उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते.
संत, महापुरुषांचे विचार जोपासावेत : महाराष्ट्रात संतांची भूमिका लोकप्रबोधनाची होती. अंधश्रद्धा दूर करण्याची भूमिका आप्पासाहेबांनी मांडली. संतांचे आणि महापुरुषांचे विचार आजच्या पिढीने जोपासावेत, असे आवाहन डॉ. वसंत भोसले यांनी केले.
उपस्थिती : यावेळी कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम के कापूरकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी, प्राध्यापक,विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.