उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराड येथील जाहीर सभेत जीभ घसरल्याने त्यांचा महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. ना. फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने काँग्रेससह महाविकास आघाडीच्या संतप्त महिला, तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
खालच्या पातळीवर टीका : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीतर्फे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवार, दि. 15 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भर व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जीव घसरली.
अमके झाले.. तमके झाले.. तर माझ्यामुळेच :श्री. चव्हाण यांच्यावर टीका करताना ना. फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराडच्या स्टेडियमसाठी एक फुटकी कवडीही दिली नाही. तसेच कराडला महामार्गावर भाजपच्या माध्यमातून झालेला उड्डाणपूल आम्हीच केल्याचे ते सांगतात. खरंतर त्यांच्यावर विकासकामांवर बोलायला मुद्देच नाहीत. त्यामुळे दुसऱ्याने केलेली कामे आम्हीच केली असल्याचे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विकास केला तर आम्हीच केला, अमके झाले तर माझ्यामुळेच झाले, तमके झाले तर माझ्यामुळेच झाले, अशी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांची जीभ घसरली.
‘आमचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण’ :हाच मुद्दा घेऊन महाविकास आघाडीतर्फे शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘आमचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण’ अशाही घोषणा महाविकास आघाडीतर्फे उपस्थित महिला, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्या.
भाजपला जागा दाखवूया : या निषेध आंदोलनात काँग्रेस महाविकास आघाडीच्या संतप्त महिला, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘सुज्ञ कराडकर तुम्हाला धडा शिकवतील, यशवंतरावांचा वारसा असलेल्या कराडला कलंकित करणाऱ्या भाजपला जागा दाखवूया, टीका करणाऱ्यांना घरी पाठवूया’, अशा अर्थाचे फलक झळकवत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.