कराड/प्रतिनिधी : –
ऊसाला गत गळीत हंगामाचा 500 रुपयांचा दुसरा हप्ता साखर कारखानदारांनी दिवाळीपूर्वी द्यावा. तसेच आगामी गळीत हंगामाची पहिली उचल 4 हजार रुपये मिळाली पाहिजे. दिवाळी सणाला 500 रुपयांचे बिल न दिल्यास साखर कारखान्यांची धुरांडी पेटू देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
शेतकरी मेळावा व सन्मान सोहळा : कार्वे, ता. कराड येथे बळीराजा शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा, पत्रकार सन्मान सोहळा व पदाधिकारी निवडीचा संयुक्तिक कार्यक्रम शुक्रवारी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बैठकीत ऊस दरासंदर्भात चर्चा : संघटनेतर्फे आयोजित बैठकीत पंजाबराव पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गत गळीत हंगामातील थकीत रक्कम, त्याचबरोबर आगामी गळीत हंगामामध्ये उसाला चार हजार रुपयांचा दर मिळण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पत्रकारांचा सन्मान : शेतकऱ्यांचा प्रश्नांवर बळीराजा संघटनेतर्फे वेळोवेळी करण्यात येणारी आंदोलने, मोर्चे, तसेच आणि माध्यमातून उठवण्यात येणाऱ्या आवाजाबाबत सर्वच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधनींकडून चांगले वार्तांकन करत सदरचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याचे काम केले जाते. याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्रकारांना सन्मानपत्र देऊन त्यांचा पंजाबराव पाटील यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
‘बळीराजा’च्या निवडी जाहीर : या बैठकीत विश्वास जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व आनंदराव थोरात यांची कराड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नंतर पंजाबराव पाटील तसेच आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या अभिनंदन केले.
मान्यवरांची उपस्थिती : बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, उत्तमराव खबाले, सुनील कोळी, उत्तमराव पाटील, पोपटराव जाधव, आबा शेवाळे, दिगंबर जगताप यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.