लवकरच १५०० कोटी व्यवसायाच्या दिशेने वाटचाल – सत्यनारायण मिणीयार
कराड/प्रतिनिधी : –
कराड मर्चट सहकारी क्रेडिट संस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती करत एकूण व्यवसायाचा टप्पा तब्बल १००० कोटींवर नेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये १५ टक्के तर कर्ज वितरणात १७ टक्के वाढ नोंदवत संस्थेने भक्कम आर्थिक कामगिरी केली आहे. लवकरच हा व्यवसाय १५०० कोटींच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास संस्थेचे प्रमुख सत्यनारायण मिणीयार यांनी व्यक्त केला.
एनपीए शून्य : सभासदांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेच्या ठेवी ५८१ कोटींवर पोहोचल्या असून, ४२५ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. प्रभावी वसुलीमुळे संस्थेने नक्त एनपीए शून्य टक्क्यांवर राखण्यात यश मिळवले आहे. तसेच नफ्यातही लक्षणीय वाढ होऊन एकूण १८ कोटींचा ढोबळ नफा संस्थेला मिळाला आहे.
कोअर बँकिंग : संस्थेचे कामकाज सध्या २७ शाखांमधून सुरू असून, त्यापैकी १९ शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत. आधुनिक बँकिंग सुविधांचा अवलंब करत इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर सुविधा, तसेच क्यूआर कोड प्रणालीद्वारे व्यवहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व शाखा कोअर बँकिंग (CBS) प्रणालीशी जोडण्यात आल्या आहेत.
सामाजिक बांधिलकी : सामाजिक बांधिलकी जपत मर्चट समूहाने ‘वधू-वर सूचक केंद्र’ सुरू केले असून, ‘स्वर्गरथ’ ही उपक्रमही राबविला आहे. नागरिकांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील, व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, संचालक आनंदाराव शिंदे, सुरेश पवार, डॉ. मुकुंद लाहोटी, डॉ. शरद क्षीरसागर, भास्करराव पाटील, आकाश जाधव तसेच व्यवस्थापक अशोक माटेकर उपस्थित होते.
कृतज्ञता : सभासद, ठेवीदार व कर्जदार यांच्या सहकार्याबद्दल सर्व मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचेही कौतुक केले.