वयाच्या बासष्टीत पुन्हा भेटले शालेय सवंगडी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कालेच्या महात्मा गांधी विद्यालयात १९७८-७९ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

स्वप्नील पोतदार/कराड : –

काळ पुढे सरकत गेला, आयुष्याच्या वाटा वेगवेगळ्या दिशांना वळल्या; मात्र शालेय जीवनातील निरागस क्षण आणि सवंगड्यांची मैत्री मनाच्या कोपऱ्यात कायमच जिवंत राहते. अशाच भावना पुन्हा एकदा उचंबळून आल्या त्या काले (ता. कराड) येथील महात्मा गांधी विद्यालयात भरलेल्या १९७८-७९ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात. वयाची बासष्टी पार केलेल्या या मित्रमंडळींनी तब्बल चार दशकांनंतर पुन्हा एकत्र येत बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला आणि शाळेच्या अंगणात पुन्हा एकदा हसण्याचे, गप्पांचे आणि आठवणींचे सूर रंगले.

अभिवादन : कार्यक्रमाची सुरुवात गावातील बसस्थानक परिसरात उभारलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. सरस्वती पूजनासह कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या सहचारिणी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ झाला.

हीच यशाची खरी पायाभरणी : या स्नेहमेळाव्याला सेवानिवृत्त प्राध्यापक मनोहर यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात प्रा. मनोहर यादव म्हणाले, शाळा आणि गुरुजनांनी दिलेली शिकवण हीच आपल्या यशाची खरी पायाभरणी आहे. आयुष्याच्या प्रवासात कितीही पुढे गेलो, तरी शाळेशी आणि गावाशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे सांगत त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने प्राणायाम व योगाचे महत्त्वही अधोरेखित केले. तसेच संस्कृतमधील मनाच्या श्लोकाप्रमाणे आपले आचरण ठेवावे, असेही मत व्यक्त केले.

जुन्या आठवणींना उजाळा : कार्यक्रमात त्या काळातील शिक्षकांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. टी. आर. पवार, डी. वाय. पाटील, डोंगरे सर, मोरे सर, तसेच विद्यमान मुख्याध्यापक पवार सर यांच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

काले : येथील महात्मा गांधी विद्यालयाची नूतन इमारत.

आरोग्याची काळजी घ्या : माजी विद्यार्थ्यांनी वयोमानानुसार आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डोंगरे सर यांनी दिला.

जीवनात उत्साह टिकवण्याचा मंत्र : धार्मिक व निसर्ग पर्यटनाद्वारे जीवनात उत्साह टिकवण्याचा मंत्र डी. वाय. पाटील सर यांनी दिला.

कृतज्ञता : या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी केवळ आठवणींमध्ये रमण्यापुरतेच न थांबता शाळेबद्दलची आपली कृतज्ञताही कृतीतून दाखवली. विद्यालयाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ११ सीसीटीव्ही कॅमेरे भेट देत ‘शाळा माउली’प्रती आपले ऋण व्यक्त केले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश : सर्व उपस्थितांना बेल व सोनचाफ्याची रोपे देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

मनोगत : कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जगु दिवटे यांनी केले. पंडित यादव, संजय पाटील, जयवंत यादव यांनी आपल्या मनोगतातून गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

सहकार्य : या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संजय पाटील, विश्वनाथ कुंभार, जगु पाटील, दुष्यंत कुलकर्णी, रवी कुंभार, गणपतराव यादव, पांडुरंग शेडगे, जयवंत यादव आदींनी मोलाचे सहकार्य केले.

दाटून कंठ आला : दुष्यंत कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ‘वर्षे कितीही लोटली तरी शाळा आणि सवंगडी कधीच विसरता येत नाहीत; कारण तेच आपल्या आयुष्याचे खरे सोन्याचे दिवस असतात!”, अशा भावना सर्वांच्या मनात दाटल्याचे दिसून आले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!