कराड अर्बन बँकेची झेप ‘६५०० कोटीं’पार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

नऊ महिन्यांत विक्रमी ७५० कोटींची भर; सलग तिसऱ्या वर्षी ‘शून्य’ एनपीए – अध्यक्ष समीर जोशी 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड अर्बन बँकेने सातत्यपूर्ण प्रगतीची परंपरा कायम ठेवत चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७५० कोटी रुपयांची विक्रमी व्यवसायवाढ साध्य करत बँकेने एकूण व्यवसाय ६५८६ कोटी रुपयांवर नेला आहे. या कामगिरीमुळे बँकेने ६५०० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.

शून्य टक्के नक्त एनपीए : मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवींमध्ये ४२७ कोटी रुपयांची भर पडून एकूण ठेवी ४००१ कोटींवर पोहोचल्या आहेत. तर कर्जव्यवहारात ३२१ कोटी रुपयांची वाढ होऊन कर्जपोर्टफोलिओ २५८५ कोटींवर गेला आहे. व्यवसायवाढीसोबतच वसुलीच्या आघाडीवरही बँकेने लक्षणीय यश मिळवत सलग तिसऱ्या वर्षी ‘शून्य टक्के’ नक्त एनपीए राखण्यात यश मिळवले आहे.

आर्थिक पाया अधिक सक्षम : बँकेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेताना माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम म्हणाले, जुन्या थकबाकी खात्यांमधून गतवर्षात ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली, तर राईट ऑफ खात्यांमधूनही १.७५ कोटी रुपये परत मिळवण्यात यश आले. यामुळे एकूण अनुत्पादित मालमत्तेत २.१५ टक्क्यांनी घट झाली असून, बँकेचा आर्थिक पाया अधिक सक्षम झाला आहे.

नफा टिकवून ठेवण्यात बँकेला यश : नफ्याच्या बाबतीतही बँकेने भक्कम कामगिरी केली आहे. करपूर्व ढोबळ नफा ७०.५८ कोटी रुपये असून, कर व तरतुदीनंतर निव्वळ नफा २६.५२ कोटी रुपये झाला आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सिक्युरिटीजच्या मूल्यात घट झाल्यामुळे ४३.४३ कोटी रुपयांची तरतूद करावी लागली, तरीही नफा टिकवून ठेवण्यात बँकेला यश आले आहे.

डिजिटल प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात : डिजिटल बँकिंग क्षेत्रातही कराड अर्बन बँक वेगाने पुढे जात आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मोबाईल बँकिंग सेवेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज यूपीआयद्वारे ३० हजारांहून अधिक व्यवहार होत असून, व्यापारी वर्गही या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. बँक आता स्वतःच्या @okkucb यूपीआय आयडीद्वारे व्यवहार सक्षम करत असून, आगामी काळात डिजिटल सेवांचा आणखी विस्तार करण्याचा मानस आहे. कर्जप्रक्रिया आणि मंजुरी प्रणालीही पूर्णपणे डिजिटल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी दिली.

भांडवली सक्षमता टिकवून ठेवली : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आर्थिक क्षेत्रात आव्हाने निर्माण झाली असतानाही बँकेने भांडवली सक्षमता टिकवून ठेवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषांपेक्षा २ टक्के अधिक भांडवल पर्याप्तता प्रमाण राखण्यात बँकेला यश आले असल्याचे उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी स्पष्ट केले.

यशस्वीरित्या मात : बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी म्हणाले, सरकारी कर्जरोख्यांच्या बाजारमूल्यात झालेल्या घसरणीमुळे मोठी तरतूद करावी लागली; मात्र बँकेच्या सक्षम आर्थिक नियोजनामुळे या परिस्थितीवर यशस्वीरित्या मात करण्यात आली.

महाराष्ट्रभर विस्तार करण्याचा निर्धार : नव्याने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर केवळ नऊ महिन्यांतच विक्रमी व्यवसायवाढ साध्य झाल्याचे समाधान व्यक्त करत सीए. धनंजय शिंगटे यांनी भविष्यात ‘शून्य एनपीए’ कायम राखत महाराष्ट्रभर विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

संस्थेची प्रगती ही एखाद्या व्यक्तीवर अवलंबून नसून सभासदांचा विश्वास, पारदर्शकता आणि सेवक-संचालकांचे टीमवर्क यावरच तिची उभारणी होते. कराड अर्बन बँकेची वाटचाल हेच सिद्ध करते. 

– सुभाषराव जोशी (कुटुंबप्रमुख, कराड अर्बन बँक) 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!