जिल्हा व तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने दोन शिक्षकांचा गौरव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

तालुक्यातील आदर्श शाळा कोळेवाडी या जिल्हा परिषद शाळेच्या मुकुटात यावर्षी दुहेरी मानाचा तुरा रोवला गेला आहे. शाळेतील आदर्श शिक्षक प्रमोद पांडुरंग गायकवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर संदीप उत्तम कोरडे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या दुहेरी यशामुळे शाळेचा नावलौकिक अधिक उंचावला असून, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुरस्कार सोहळा : तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबर रोजी करण्यात आले. त्यानंतर १२ मार्च रोजी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, तसेच शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी उपस्थित होते.

गुणवत्तेच्या आधारे निवड : शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक पुरस्कार हा अत्यंत मानाचा समजला जातो. हा पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक शिक्षक प्रयत्नशील असतात. यावर्षी सातारा जिल्हा परिषदेकडून ऑनलाइन पद्धतीने शिक्षक पुरस्कार यंत्रणा राबवण्यात आली होती. शिक्षकांनी सादर केलेल्या माहितीचे सखोल परीक्षण व प्रत्यक्ष पडताळणी करून पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय केवळ गुणवत्तेच्या आधारे पुरस्कार देण्यात आल्याने विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.

जिल्ह्यात आदर्श शाळा : कोळेवाडी जिल्हा परिषद शाळा ही विविध शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांमुळे सातारा जिल्ह्यात आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. या यशामध्ये प्रमोद गायकवाड व संदीप कोरडे या दोन्ही शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना अनुक्रमे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

अनोखा योग : एकाच शाळेला, तेही एकाच वर्षात, जिल्हा व तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणे, ही दुर्मिळ घटना मानली जाते. हा अनोखा योग कोळेवाडी शाळेला लाभल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अभिनंदनाचा वर्षाव : या दोन्ही शिक्षकांवर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!