एकसंघता, फिटनेस आणि खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी विविध विभागांचा सहभाग – डॉ. दत्तात्रय जाधव
कराड/प्रतिनिधी : –
राज्यभरातील तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६ ला कराड येथे उत्साहात प्रारंभ झाला. दि. २७ व २८ मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धांचे उद्घाटन सहसंचालक (तंत्रशिक्षण) विभागीय कार्यालय, पुणे येथील डॉ. दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे पार पडले.
एकत्रितपणे स्पर्धेची जबाबदारी : मा. संचालक तंत्रशिक्षण संचालनालय डॉ. विनोद मोहितकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे व तंत्रशिक्षण कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन आणि शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, कराड यांनी एकत्रितपणे या स्पर्धेची जबाबदारी स्वीकारली आहे.

एकसंघता, सहकार्य व खिलाडू वृत्ती : उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. दत्तात्रय जाधव यांनी, अशा क्रीडा स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकसंघता, सहकार्याची भावना आणि खिलाडू वृत्ती विकसित होते. तसेच शारीरिक तंदुरुस्ती राखून अधिक ऊर्जा व उत्साहाने काम करण्यास प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.
सहभाग : या स्पर्धांमध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (मुंबई), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ (मुंबई), तसेच पुणे, संभाजीनगर, नाशिक, मुंबई आणि अमरावती येथील विभागीय कार्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.













