माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका; राज्यपालांकडून न्यायालयीन चौकशीची मागणी
कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीदरम्यान घडलेल्या घडामोडींवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भाजप नेतृत्वावर लोकशाहीची पायमल्ली केल्याचा आरोप केला आहे. निवडणूकपूर्व आघाडी असूनही आणि सदस्यांचे स्पष्ट बहुमत विरोधी गटाकडे असताना सत्ता बळकावण्याचा प्रकार हा ‘लोकशाहीवरील काळा डाग’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावरून मंडळी भूमिका : श्री. चव्हाण यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपली भूमिका मांडताना साताऱ्यातील घटना अत्यंत वेदनादायक व निंदनीय असल्याचे नमूद केले. राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्र सत्ता असताना जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अशा प्रकारे सत्तांतर घडवून आणणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीची हत्या : यावेळी पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा असलेल्या जिल्ह्यातच लोकशाहीची हत्या होत असल्याची खंत व्यक्त केली. या घटनेतून महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी किती खालावली आहे, हे दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पोलीस व प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : सत्ता हेच सर्वस्व मानून ‘यशवंत विचार’ संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलीस व प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाने घेतलेली भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
जिल्ह्यातील माध्यमांचे कौतुक : जिल्ह्यातील माध्यमांनी निर्भीडपणे दिलेल्या बातम्या व घटनांचे केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण यांमुळे सत्य समोर आले, असे म्हणत त्यांनी माध्यमांचे अभिनंदन केले.
न्यायालयीन चौकशीचे आदेश द्यावेत : या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्यपालांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही श्री. चव्हाण यांनी केली आहे. तसेच या घटनेचे पडसाद राज्य सरकारच्या स्थैर्यावर उमटण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.