सर्प व जखमी प्राण्यांसाठी तात्काळ मदतीची सुविधा; नागरिकांना मोठा दिलासा, पर्यावरण व प्राणीसंवर्धनाला बळ
कराड/प्रतिनिधी : –
कराड व पाटण तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह पर्यावरण व प्राणीसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या WRK (वाइल्डहार्ट रेस्क्यूअर नाईट्स) या सामाजिक संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत संपूर्ण कराड-पाटण परिसरासाठी एकच अधिकृत हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे.
सोयीस्कर आणि जलद सेवा : सर्पदंश, सर्प आढळणे किंवा अपघातग्रस्त व जखमी प्राण्यांच्या मदतीसाठी नागरिकांना आता अधिक सोयीस्कर आणि जलद सेवा उपलब्ध होणार आहे.
सर्पमित्र व प्राणिमित्रांकडून स्थापना : WRK ही संस्था कराड शहर व परिसरातील सर्पमित्र व प्राणिमित्रांनी एकत्र येऊन स्थापन केली असून, गेल्या अनेक वर्षांपासून ती निःस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहे.
उल्लेखनीय कार्य : आतापर्यंत अनेक वेळा रात्री-अपरात्री केवळ एका फोन कॉलवर WRK चे सर्पमित्र घटनास्थळी दाखल होऊन सर्पांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे सर्पदंशाचे धोके टळून अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्राण वाचवण्यात यश : यासोबतच रस्ते अपघातात जखमी झालेले प्राणी किंवा आजारी अवस्थेत आढळणाऱ्या प्राण्यांवर तात्काळ उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्याचे उल्लेखनीय कार्य WRK च्या प्राणिमित्रांकडून सातत्याने केले जात आहे. हा उपक्रम केवळ मानवी सुरक्षिततेपुरता मर्यादित नसून, पर्यावरण संरक्षण व जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
…या नंबरवर साधा संपर्क : या सामाजिक बांधिलकीतून WRK ने आता कराड-पाटण परिसरासाठी ७५५८५५५४१५ हा एकच हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. यापुढे सर्पमित्र किंवा प्राणिमित्रांचे वेगवेगळे संपर्क क्रमांक शोधण्याची गरज भासणार नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून घटनास्थळाची अचूक माहिती दिल्यास WRK कडून तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सामाजिक जबाबदारीचे उदाहरण : एकच संपर्क क्रमांक उपलब्ध करून देत WRK ने सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
आभार : या उपक्रमाबद्दल दक्ष कराडकर ग्रुपच्या वतीने WRK टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजात जागरूकता वाढून आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर मदत मिळण्यास मोठा हातभार लागतो, असेही त्यांनी नमूद केले.
चळवळीला नवे बळ : WRK च्या या उपक्रमामुळे कराड-पाटण परिसरातील नागरिकांना आता अधिक जलद, विश्वासार्ह आणि प्रभावी मदत मिळणार असून, पर्यावरण व प्राणीसंवर्धनाच्या चळवळीला नवे बळ मिळणार आहे.