हळदीकुंकू समारंभास दीड हजार महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकारातून आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

मराठी संस्कृतीतील पारंपरिक व सौभाग्याचे प्रतीक असलेला हळदीकुंकू समारंभ कराड येथे उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे नगरसेवक सुहास जगताप व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सोमवार पेठ (कराड) येथे भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

हळदीकुंकू, वाण व भेटवस्तू : या समारंभाचे अध्यक्षस्थान कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मातोश्री सौ. उत्तरा सुरेश भोसले (आईसाहेब) यांनी भूषविले. पारंपरिक पद्धतीने सुवासिनींना हळदीकुंकू लावून वाण व भेटवस्तू देण्यात आल्या. महिलांच्या सौभाग्यवृद्धीसाठी व सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

विशेष दखल : कृष्णा सरिता महिला उत्पादक संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आईसाहेबांच्या कार्याचीही यावेळी विशेष दखल घेण्यात आली.

मनोरंजन : कार्यक्रमात मनोरंजनाची रंगत आणण्यासाठी ‘स्वरांगण ग्रुप’चे प्रा. दीपक तडाके सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध खेळ व मधुर गायनाचा कार्यक्रम सादर करून उपस्थित महिलांचे मनोरंजन केले.

बक्षिसांची लयलूट : या हळदीकुंकू समारंभात जवळपास दीड हजार महिलांनी सहभाग नोंदवला. विविध खेळांमध्ये विशेषतः ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अनेक बक्षिसे पटकावली. संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह व आपुलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले.

कौतुक : सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा हळदीकुंकू समारंभ शहरात चर्चेचा विषय ठरला असून, नगरसेवक सुहास जगताप यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!