कृषी प्रदर्शनात फळपिक स्पर्धा व श्वान प्रदर्शनाची रंगत; वरद जगताप यांचा लॅब्राडोर ‘चॅम्पियन ऑफ द शो’; आज समारोप
कराड/प्रतिनिधी : –
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार तळावर सुरू असलेल्या कृषी, औद्योगिक व पशुपालन प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी फळपिक स्पर्धा आणि श्वान प्रदर्शनाने विशेष आकर्षण निर्माण केले. जिल्हाभरातून आलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या दर्जेदार फळपिकांबरोबरच विविध देशी-विदेशी श्वान जातींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

संयुक्तपणे प्रथम क्रमांक : फळपिक स्पर्धेत कराड तालुक्यातील वडोली निळेश्वरचा पेरू आणि फलटण तालुक्यातील सासकलचे सिताफळ यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. पेरूचे उत्पादन हणमंत जिजाबा पवार यांचे, तर सिताफळ बबन रामचंद्र मुळीक यांचे आहे.
द्वितीय क्रमांक : आशालता कृष्णदेव कदम (करवडी, ता. कराड) यांच्या चिक्कू व सुशीला दिनकर फडतरे (धुमाळवाडी, ता. फलटण) यांच्या ड्रॅगन फ्रुट यांना विभागून देण्यात आला.
तृतीय क्रमांक : ऋषिकेश जयसिंग ढाणे (पाडळी, ता. सातारा) यांच्या स्टार फ्रुट व संभाजी परबती इंगवले (रिसवड, ता. कराड) यांच्या ड्रॅगन फ्रुट यांनी संयुक्तपणे मिळवला.
उत्तेजनार्थ पारितोषक : पांडुरंग तुकाराम तोडकर (वानरवाडी-तारूख) यांच्या ईडलिंबू आणि अनिरुद्ध धनावडे (मेटगुताड, ता. महाबळेश्वर) यांच्या गुजबेरी यांना जाहीर झाले. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ रुपये, शिल्ड, प्रमाणपत्र व बुके देण्यात येणार आहेत.

दरम्यान, श्वान प्रदर्शन व स्पर्धेला श्वानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहा गटांत झालेल्या या स्पर्धेत वडगाव हवेली येथील वरद नितीन जगताप यांच्या लॅब्राडोर जातीच्या श्वानाने ‘चॅम्पियन ऑफ द शो’ हा मान पटकावला. पिटबुल, लॅब्राडोर, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, रॉटविलर, ग्रे हाउंड, पामेरियन तसेच देशी-कारवानी श्वान जातींचा सहभाग लक्षवेधी ठरला.
श्वान प्रदर्शन – प्रमुख विजेते
लॅब्राडोर – चॅम्पियन ऑफ द शो – वरद नितीन जगताप (वडगाव हवेली) – लॅब्राडोर, श्रीराज नितीन लवटे (मलकापूर) ध्रुव पेटस (कराड), पामेरियन गट विक्रांत तोमर (कराड), जयराज अरविंद पोतदार (आटके), शुभम संजय चव्हाण (कोळेवाडी), विलास सखाराम येलोंडे (कराड), डॉबरमॅन – अनिल सदाशिव शेडगे (धोंडेवाडी), संकेत महेंद्र भोसले (खरशी), जे.जे. पेट्स (कराड)












