घारेवाडी (ता. कराड) येथे शिवम प्रतिष्ठानच्या वतीने २५ वे बलशाली युवा हृदय संमेलन दि. ९ जानेवारीपासून आयोजित करण्यात आले आहे. युवक-युवतींमध्ये देशभक्ती, सकारात्मक ऊर्जा, सामाजिक जाणीव व नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, हा संमेलनाचा मुख्य उद्देश असून, तीन दिवस विविध विषयांवरील भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रौप्य महोत्सवी वर्ष : स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवर वक्ते, समाजसेवक, उद्योजक व तज्ज्ञ यांची व्याख्याने, प्रकट मुलाखती तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संमेलनासाठी ऑनलाईन नावनोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.
पहिला दिवस : ९ जानेवारी (शुक्रवार)
संमेलनाचा प्रारंभ गुजरात येथील समाजसेविका मित्तल पटेल यांच्या ‘समानता के राह पर…’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. त्यानंतर पुण्याच्या सायबर पत्रकार व लेखिका मुक्ता चैतन्य यांचे ‘स्क्रीनटाइम : डिजिटल डिटॉक्स’, मुंबईचे व्यवसायतज्ज्ञ ओंकार माळी यांचे ‘स्टार्ट-अप ते एक्स्पोर्ट’ तसेच पर्यावरणतज्ज्ञ सतीश खाडे यांचे ‘तळाच्या पायाच्या भेगा भरशील का रे मेघा’ या विषयांवरील व्याख्याने होणार आहेत.
दुसरा दिवस : १० जानेवारी (शनिवार)
पहिल्या सत्रात डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांचे अभ्यासासाठी विपश्यनेची उपयुक्तता या विषयावर मार्गदर्शन होईल. त्यानंतर युवराज पाटील नांदेडचे कादंबरीकार मनोज बोरगावकर यांची प्रकट मुलाखत घेतील.
दुपारचे सत्र : दुपारच्या सत्रात पुण्याचे उद्योजक व गावरान कुक्कुटपालन क्षेत्रातील तज्ज्ञ सौरभ तापकीर यांची मुलाखत विपुल धनगर घेणार आहेत. म्हैसूरच्या समाजसेविका फतिमा शबाना यांची मुलाखत रेणुका कल्पना घेतील.
सायंकाळचे सत्र : सायंकाळच्या सत्रात शौर्य पुरस्कारप्राप्त मधुसूदन सुर्वे यांचे ‘धैर्य आणि समर्पणाची शौर्यगाथा’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे.
तिसरा दिवस : ११ जानेवारी (रविवार)
तिसऱ्या दिवशी ऋचिका खोत व स्वामीराज भिसे यांच्या कीर्तनात्मक वारीने कार्यक्रमास सुरुवात होईल. त्यानंतर युवा समाजसेवक सिद्धेश लोकरे यांचे ‘मिशन ३०३०३ : जेन-झेड सफर सपनों का’ या विषयावर व्याख्यान होईल. संमेलनाची सांगता संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने होणार आहे.
युवकांसाठी संमेलन दिशादर्शक : तीन दिवस चालणाऱ्या या युवा संमेलनातून विचारप्रवर्तक, प्रेरणादायी व समाजोपयोगी विषयांवर सखोल मंथन होणार असून, युवकांसाठी हे संमेलन दिशादर्शक ठरणार आहे.