ले. कर्नल सतेश हंगे यांच्या अध्यक्षतेखाली समस्यांवर सविस्तर चर्चा; प्रशांत कदम यांचा सन्मान
कराड/प्रतिनिधी : –
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महसूल, पोलिस, वन, कृषी, ग्रामविकास यांसह विविध शासकीय विभागांमध्ये माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या अडचणी, शासकीय कार्यालयांमध्ये मिळणारी असन्मानजनक वागणूक याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सक्रिय संवाद : या सैनिक दरबारात माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे योग्य निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे यांनी सर्व उपस्थितांना प्रशासनाशी सक्रिय संवाद साधून प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.
प्रशांत कदम यांचा सन्मान : या प्रसंगी माजी सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम यांचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त होत असलेले विश्वास माळी (माजी सैनिक, कर्मचारी, सैनिक कल्याण कार्यालय) यांना सैनिक फेडरेशन व उपस्थित माजी सैनिकांनी शाल व श्रीफळ देऊन गौरविले.
मान्यवरांची उपस्थिती : बैठकीस माजी सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी विलास घाडगे, सेना मेडल प्राप्त शंकर माळवदे, नि. सुबेदार मेजर अशोक नलवडे (सदस्य, संरक्षण समिती), सातारा तालुका उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष वराडे, रवींद्र घाडगे, जिल्हा महिला ब्रिगेड अध्यक्षा सौ. विद्या बर्गे, अनिल शिंदे यांच्यासह अनेक माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचा समारोप भारत माता की जय आणि वंदे मातरम् या घोषणांनी झाला.