तहसीलदार कल्पना ढवळे; किमान १०० खातेदारांची पीकपाहणी बंधनकारक
कराड/प्रतिनिधी : –
तालुक्यातील पोलीस पाटील यांची पीक पाहणीसाठी सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही ठराविक अपवाद वगळता बहुतांशांनी या कामात उदासीनता दाखवली असल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शुक्रवार, ३१ ऑक्टोबरपासून सर्व पोलीस पाटलांनी जबाबदारीने कामकाज सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना तहसीलदार सौ. कल्पना ढवळे यांनी दिल्या.
… अन्यथा, जबाबदारी निश्चिती : तहसीलदार ढवळे म्हणाल्या की, पीक पाहणीचे कामकाज मागे पडू नये. प्रत्येक पोलीस पाटील यांनी आपली जबाबदारी ओळखून तत्परतेने कामाला लागावे. कोणत्याही प्रकारची हलगर्जी आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल.
हयगय अथवा दुर्लक्ष नको : तसेच प्रत्येक सहाय्यक पोलीस पाटलांनी किमान १०० खातेदारांची पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. या कामात हयगय अथवा दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक प्रक्रिया : पीक पाहणी ही शेतकऱ्यांच्या हानी, भरपाई व विमा योजनांसाठी अत्यावश्यक प्रक्रिया असल्याने सर्वांनी गंभीरतेने सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.