डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराड (विद्यानगर) चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत, त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती : हा पुरस्कार अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड यांच्या वतीने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जवळील सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात दि. १२ ऑक्टोंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
तांत्रिक शिक्षणाचा प्रसार : डॉ. गुजर यांनी गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाचा प्रसार करून हजारो विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शैक्षणिक दर्जा, संशोधन आणि सामाजिक योगदान या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
अभिनंदन : या बहुमानाबद्दल अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराडचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रविण काकडे यांनी डॉ. गुजर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून डॉ. अशोक गुजर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.