नामदेवराव पाटील अध्यक्ष, तरीही मनोहर शिंदेच केंद्रस्थानी!

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

फेरबदल की अंतर्गत राजकारण?; कार्यकर्ते, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण 

राजेंद्र मोहिते/कराड : – 

विधानसभा निवडणुकीनंतर कराड दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात झालेल्या सत्ताबदलानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. कराड दक्षिण काँग्रेसच्या अध्यक्षपदावर माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतरही, त्यांच्या अभिनंदन फलकावर मनोहर शिंदे यांचा फोटो झळकल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मनोहर शिंदेच केंद्रस्थानी असल्याची चर्चा रंगली आहे.

सत्ताधारी पक्षाकडे ओढा : अलीकडे सत्ताधारी पक्षाकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांचे भाजप प्रवेशाबाबतचे चर्चेचे वारे काही काळ थांबले होते. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच तापल्या होत्या. तत्पूर्वी, नामदेवराव पाटील हेही भाजपकडे झुकत असल्याच्या वाऱ्यांनी जोर धरला होता.

चर्चांना पूर्णविराम की अल्पविराम? : दोघेही अद्याप काँग्रेसमध्येच सक्रिय असल्याने त्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम मिळाल्याचे दिसते. तरीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अद्याप दोन महिने बाकी असल्याने ‘हा पूर्णविराम की अल्पविराम?’ असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहे.

मी अद्याप काँग्रेसमध्येच : मनोहर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत “मी अद्याप काँग्रेसमध्येच आहे,” असा खुलासा केला होता. मात्र त्यानंतर काँग्रेसच्या सभा, बैठका, पत्रकार परिषदांपासून शिंदे यांचा अनुपस्थितीचा क्रम सुरूच राहिला. परिणामी, त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा जोर चढला.

शिंदेंचा प्रभाव कायम : त्यातच नामदेवराव पाटील यांच्या अध्यक्षपद निवडीच्या फलकावर मनोहर शिंदे यांचा मध्यवर्ती फोटो झळकल्याने ‘शिंदेंचा प्रभाव अजून कायम’ असल्याचे चित्र उमटले.

गनिमी कावा..? काँग्रेसने हे रणनीतिक पाऊल उचलले असून, सत्ताधाऱ्यांना राजकीय प्रलोभने दाखवून आगामी स्थानिक निवडणुकांसाठी गनिमी कावा वापरला जात आहे का? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत.

दक्षिणेत काँग्रेसपुढे पक्ष बांधणीचे आव्हान 

विधानसभेनंतर काँग्रेसमधील काही स्थानिक प्रभावी नेते सत्ताधारी पक्षात गेले आहेत, तर काही प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कराड दक्षिणेत काँग्रेसचा गड पुन्हा उभारण्याचे मोठे आव्हान उभे आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच कराड आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सशक्त करण्यासाठी स्थानिक नेते व तळागाळातील कार्यकर्त्यांनीही कंबर कसण्याची वेळ आली आहे.

‘उंडाळकर’ यांची पोकळी कोण भरणार? 

कराड दक्षिणेत उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या रयत संघटनेचा प्रभाव मोठा होता. विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांची साथ असतानाही पराभव पत्करावा लागला. मात्र, आता उंडाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेससमोर नेतृत्वाच्या पातळीवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कोण भरून काढणार आणि काँग्रेस पुन्हा दक्षिणेत गतवैभव मिळवेल का? हे प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!