श्रीनिवास पाटील; स्व. जयवंतराव भोसले व रविंद्र बेडकिहाळ यांना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान
कराड/प्रतिनिधी : –
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक बाबींसोबतच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे बोट धरून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. संस्थेच्यावतीने या सोहळ्यात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पा व जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करुन खऱ्या अर्थाने यशवंत विचारांचा जागर केला आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
पुरस्कार वितरण : श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता सोहळा’ कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडला. या सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रमुख पाहुणे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, विशेष अतिथी कृष्णा विश्वविद्यापिठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले उपस्थित होते. व्यासपीठावर श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान सावकार, चेअरमन राजन वेळापुरे, अरुण जाधव, सौ. अलका बेडकिहाळ उपस्थित होते.
सन्मान : या सोहळ्यात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांचे (मरणोत्तर) सन्मानपत्र डॉ. सुरेश भोसले यांनी स्विकारले. तसेच ज्येष्ठ पत्रकार रविंद बेडकिहाळ यांनाही ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.
गोरगरीबांना आधार : यशवंतराव चव्हाण यांच्या अनेक आठवणींना उजाळा देताना श्रीनिवास पाटील यांनी आपल्याला लहानपणापासून यशवंतराव चव्हाण यांचा सहवास लाभला असल्याचे सांगितले. कालिकादेवी पतसंस्था यशवंतरावांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवित आहे, असे नमूद केले. कासार गल्लीतील ही संस्था गोरगरीबांना अडचणीच्या काळात आधार बनली असून संस्थेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी म्हटले.
पुरोगामी विचारसरणीचा सन्मान : स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णाकाठी सहकाराच्या माध्यमातून आर्थिक व शैक्षणिक बदल घडविण्याचे कार्य केल्याचे सांगत बाळासाहेब पाटील म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा व अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी जवळपास 56 वर्षांच्या पत्रकारितेच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली. पत्रकार म्हणून आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कालिकादेवी परिवाराने दिलेले हे दोन्ही पुरस्कार पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या व्यक्तींना देवून सन्मान केला आहे.












