नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज; म्हावशी येथे हिंदू संमेलन; संस्कार आणि राष्ट्रीय एकतेवर भर
कराड/प्रतिनिधी : –
जातीपातीच्या भिंती मोडून काढत हिंदू समाजाने एकत्र येणे, ही काळाची गरज आहे. एकसंध समाजरचना उभी राहिल्यास देश प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करेल, असा ठाम संदेश नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी दिला.
हिंदू संमेलन : म्हावशी, ता. पाटण येथे आयोजित हिंदू संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष तथा बजरंग दलाचे कार्यकर्ते यशवंतराव जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
…तरच समाजाची प्रगती : हिंदू समाजाची ओळख ही एकसंध संस्कृती, धर्मग्रंथ आणि संस्कारांवर आधारलेली असल्याचे सांगताना धारेश्वर महाराज म्हणाले, समाजात आजही भेदभावाचे अंश दिसून येतात, ही चिंतेची बाब आहे. सामाजिक ऐक्य आणि परस्पर सन्मान या मूल्यांचा स्वीकार केल्यासच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती शक्य आहे.
शंभूराजांच्या धर्मकार्याचा आढावा : संमेलनात सामाजिक समरसता, आर्थिक उन्नती, सांस्कृतिक जतन, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण आणि समाजकार्यातील सहभाग या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. बालव्याख्याते देवराज मोळावडे यांनी, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला.
मार्गदर्शन : मातृशक्तीच्या प्रतिनिधी म्हणून सौ. निशा फाटक यांनी ‘पंच परिवर्तन’ विषयावर मनोगत व्यक्त केले, तर व्याख्याते राजेंद्र अलोणे यांनी, दैनंदिन जीवनातून धर्मकार्यासाठी वेळ कसा द्यावा याबाबत मार्गदर्शन केले.
उपस्थिती : कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चंद्रहार निकम आणि सौरभ देशपांडे यांनी केले. संमेलनासाठी महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.