८७२ कोटींची विक्रमी वाढ; ग्राहकांच्या विश्वासावर उभा सहकाराचा भक्कम पाया – आ. डॉ. अतुल भोसले
कराड/प्रतिनिधी : –
ग्रामीण भागातील अर्थकारणाला बळ देत सर्वसामान्यांना आर्थिक आधार देणाऱ्या कृष्णा आर्थिक परिवाराने यंदाच्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती नोंदवली आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात परिवाराने तब्बल ३,१०९ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय साध्य करत विकासाची नवी उंची गाठली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत ८७२ कोटी रुपयांची वाढ नोंदवत परिवाराने ३८.९८ टक्के वाढदर साध्य केला असल्याची माहिती परिवाराचे प्रमुख आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली.
सहकारातून उभा राहिलेला आर्थिक परिवार : शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिक यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी १९७१ मध्ये कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सातत्यपूर्ण व विश्वासार्ह सेवा देत या बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेत भक्कम स्थान निर्माण केले आहे.
सक्षम आर्थिक समूह : डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या या प्रवासात पुढे विविध संस्था जोडल्या गेल्या. त्यामध्ये जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला पतसंस्था, वित्तपेटा मल्टिस्टेट सोसायटी आणि अलीकडेच समाविष्ट झालेली दि पाटण अर्बन सहकारी बँक यांचा समावेश आहे. या सर्व संस्थांच्या एकत्रित कामगिरीतून ‘कृष्णा आर्थिक परिवार’ आज एक सक्षम आर्थिक समूह म्हणून उभा आहे.
कृष्णा सहकारी बँक आघाडीवर : परिवारातील प्रमुख घटक असलेल्या कृष्णा सहकारी बँकेनेच सर्वाधिक योगदान दिले आहे. बँकेकडे ९५१ कोटी रुपयांच्या ठेवी असून ५६१ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १,५१२ कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, बँकेने सलग १२ वर्षे निव्वळ एनपीए शून्य राखत आर्थिक शिस्तीचे उत्तम उदाहरण घातले आहे. तसेच २० कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवत बँकेने स्थैर्य टिकवून ठेवले आहे.
पतसंस्था व इतर घटकांचीही उल्लेखनीय कामगिरी : जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेने १,०८७ कोटी रुपयांचा व्यवसाय करत प्रभावी कामगिरी केली असून, ठेवी ६३९ कोटी आणि कर्जवाटप ४४८ कोटी इतके आहे. कृष्णा महिला पतसंस्थेने महिलांच्या आर्थिक सबलीकरणात मोलाचे योगदान देत १४० कोटींचा व्यवसाय साध्य केला आहे. वित्तपेटा मल्टिस्टेट सोसायटीने ३४ कोटींचा व्यवसाय नोंदवला असून, नव्याने समाविष्ट झालेल्या दि पाटण अर्बन बँकेनेही ३३४ कोटींचा व्यवसाय करत परिवाराच्या एकूण वाढीत भर घातली आहे.
डिजिटल बँकिंगकडे वेगवान वाटचाल : ग्राहकांना अधिक सुलभ व जलद सेवा देण्यासाठी परिवारातील संस्थांनी डिजिटल सुविधांवर भर दिला आहे. मोबाईल बँकिंग, यूपीआय व्यवहार, एटीएम, आरटीजीएस-एनईएफटी, ई-कॉमर्स यांसारख्या अत्याधुनिक सेवांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या चार जिल्ह्यांत २७ शाखा व एक विस्तारीत कक्ष यांच्या माध्यमातून सेवा पुरवली जात आहे.
ग्राहकांचा विश्वास हेच खरे भांडवल : कृष्णा आर्थिक परिवाराच्या यशामागे ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन ही प्रमुख कारणे असल्याचे आ. डॉ. अतुल भोसले यांनी नमूद केले.
पुढील वाटचाल : आर्थिक प्रगतीचा वेग कायम ठेवत, अधिकाधिक लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्याचा निर्धार कृष्णा आर्थिक परिवाराने व्यक्त केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना सक्षम आर्थिक पर्याय उपलब्ध करून देत, सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करण्याचा परिवाराचा प्रयत्न पुढेही सुरू राहणार आहे.
सहकारमहर्षींच्या विचारांवर उभा राहिलेला हा परिवार ग्राहककेंद्रित धोरणावर ठाम आहे. येत्या काळात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून सेवा अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान करण्यावर आमचा भर असेल.
– आ. डॉ. अतुल भोसले.












