कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज मुख्य उद्घाटन; यंदा २० वे वर्ष, राज्यातील दर्जेदार कृषी प्रदर्शनांत गणना
कराड/प्रतिनिधी : –
येथील स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट आवारात आजपासून (दि. 26) 20 वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन, तसेच जिल्हा कृषी महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.
कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : या प्रदर्शनाचे मुख्य उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी संपन्न होणार आहे.
प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन : याबाबत शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार दि. 26 रोजी दुपारी 2 वाजता प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे.
पहिला दिवस : शुक्रवार दि. 26 रोजी सायंकाळी 4 वाजता कृषिमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी 5 वाजता ऊस पीक स्पर्धा व प्रदर्शन, तसेच नाविन्यपूर्ण कृषी अवजारे निर्मिती स्पर्धा होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती : उद्घाटन सोहळ्यास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार नितीनकाका पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील – उंडाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, राज्याचे पणन संचालक संजय कदम यांच्यासह अनेक मान्यवर, शासकीय अधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दुसरा दिवस : शनिवार, दि. 27 रोजी दुपारी 12 वाजता केळी घड प्रदर्शन व स्पर्धा होणार असून, सायंकाळी 4 ते 7 या वेळेत “उत्सव कृषी सौभाग्यवतींचा – खेळ पैठणीचा” हा सुप्रसिद्ध कलाकार वासू पाटील यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
तिसरा दिवस : रविवार, दि. 28 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फुले तसेच गाय–म्हैस–बैल प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत.
चौथा दिवस : सोमवार, दि. 29 रोजी फळे प्रदर्शन व स्पर्धा तसेच श्वान (डॉग) प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पाचवा दिवस : मंगळवार दि. 30 रोजी भाजीपाला पीक, शेळी–मेंढी व पक्षी प्रदर्शन व स्पर्धा होऊन सायंकाळी 4 वाजता समारोप होईल.
समारोप : याप्रसंगी स्पर्धा बक्षीस वितरण व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, प्रमुख अतिथी म्हणून राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी शिरसागर, तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित राहणार आहेत.
४०० हून अधिक स्टॉल्स : लोकनेते स्व. विलासकाका पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे यंदा २० वे वर्ष असून, राज्यातील दर्जेदार कृषी प्रदर्शनांमध्ये याची गणना होते. यावर्षी सुमारे ४०० हून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी होत असून, पिलरलेस डोम पद्धतीचा वॉटरप्रूफ मंडप, स्वतंत्र पशु–पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन व अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त स्टॉल्स हे याचे वैशिष्ट्य आहे.
लाभ घेण्याचे आवाहन : हे प्रदर्शन शेती उत्पन्न बाजार समिती कराड, कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा व महाराष्ट्र शासनाच्या आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.