अॅड. भारत मोहिते; रोटरी शिक्षण संस्थेत मोटिवेशनल व पोक्सो विषयावर चर्चासत्र
कराड/प्रतिनिधी : –
आजकाल संस्कारक्षम पिढी घडवणे हेच शिक्षणासमोरील खरे आव्हान आहे, असे मत अॅड. भारत मोहिते यांनी व्यक्त केले.
चर्चासत्र : गणपती महोत्सवानिमित्त रोटरी शिक्षण संस्था मलकापूर, ता. कराड येथे आयोजित मोटिवेशनल व पोक्सो विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. संस्थेचे सचिव विलासराव पाटील-पोतलेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गुण व नोकरी मिळवण्याचे उद्दिष्ट : शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास. परंतु, खऱ्या अर्थाने अलीकडील काळात केवळ जास्त गुण व नोकरी मिळवणे, हे उद्दिष्ट ठेवून नवीन पिढी आपली वाटचाल करत असल्याने संस्कारक्षम पिढी तयार होणार नाही, असे सांगत अॅड. मोहिते म्हणाले, त्यासाठी शिक्षणाबरोबर संस्कारही हवेत.
गुणवत्ता कशी पारखायची : आज मोबाइलच्या विळख्यात सापडून अनेक युवा स्वतःचे जीवन संपवत आहेत. केवळ आवश्यक बाबींसाठीच मोबाइलचा वापर करावा. गुणवत्ता म्हणजे काय? ती कशी पारखायची? या मातीतले महान राजे छत्रपती शिवरायांचे चरित्र अभ्यासताना समजू शकते. विद्यार्थ्यांनी या दशेत ज्ञानग्रहण करून आपले व्यक्तिमत्व घडवावे.
शिक्षणक्षेत्रातील विरोधाभासावर विचार करावा : वाईट संगतीत स्वतःचे जीवन उध्वस्त करू नये. शिक्षणक्षेत्रात विरोधाभास येऊ पाहत आहे, त्यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार करावयास हवा. भाषा हे केवळ संवाद साधण्याचे साधन असून, ते बुद्धिमत्तेचे प्रमाण होऊ शकत नाही. आपण खूप प्रगती केली. मात्र, आपण माणूस व्हायला विसरत चाललोय, ही बाब चिंताजनक आहे. अलीकडील काळात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. पण इंग्रजी येणे म्हणजे ज्ञानी झाला, हा चुकीचा समज समाजामध्ये रूढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन : यावेळी अॅड. मोहिते यांनी पोक्सो कायद्याचीही मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.