कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सभेत मंजुरी; सहा हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट, आठ लाभांश जाहीर

कराड/प्रतिनिधी : –

कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याच्या प्रस्तावास बँकेच्या १०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली. याबाबतचा अधिकृत प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.

वार्षिक सर्वसाधारण सभा : सध्या बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, रायगड तसेच मुंबई व उपनगरे येथे मर्यादित आहे. कार्यक्षेत्र वाढवून राज्यव्यापी सेवा देण्याच्या निर्णयामुळे बँकेच्या विस्तार योजनांना चालना मिळणार आहे.

सभासदांना ८ टक्के लाभांश : डॉ. एरम म्हणाले, आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ५,८३७ कोटी रुपये इतका झाला असून, यामध्ये ठेव ३,५४७ कोटी व कर्जवाटप २,२६३ कोटी इतके आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १५.२७ टक्के असून, ४५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा व २६.४७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेने यंदा सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर केला आहे.

नव्या शाखांची भर : बँकेच्या २९ शाखांनी १ कोटींपेक्षा जास्त नफा कमावला असून, सातारा शाखेने ७ कोटींच्या नफ्याचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे ३५ शाखांचे एनपीए (अनुत्पादक कर्ज) शून्य आहे. सध्या बँकेच्या ६७ शाखा कार्यरत असून, वाई, बार्शी, पंढरपूर, सांगोला व सातारा एमआयडीसी येथे नव्या शाखांची भर पडली आहे. येत्या सहा महिन्यांत हडपसर, चाकण, शिरवळ, इचलकरंजी व नातेपुते येथे शाखा सुरू होणार आहेत.

एनपीए प्रमाण पाच टक्क्यांच्या आत ठेवण्याचे उद्दिष्ट : डिजिटल सेवांना चालना देत यावर्षी मोबाईल व इंटरनेट बँकिंग सेवा अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली अंतर्गत कामकाजात वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. बँकेचे एनपीए प्रमाण पाच टक्क्यांच्या आत ठेवण्याचे उद्दिष्टही यावेळी जाहीर करण्यात आले.

एकमताने मंजुरी : सभासदत्वाबाबतच्या निर्णयामध्ये बँकेच्या प्रतिमेला बाधा पोहचवणाऱ्या सात सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. या निर्णयालाही सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

दिलीप गुरव यांना कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मुख्य कार्यकारी पदावरून निवृत्त झालेले सीए दिलीप गुरव यांना कार्यकारी संचालकपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी सीए धनंजय शिंगटे यांची प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिलीप गुरव यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल सभेत संचालक मंडळ आणि सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सभेतील एकमताने मंजूर झालेले निर्णय

सभेत अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, कार्यकारी संचालक दिलीप गुरव, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए शिंगटे, संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेपुढील सर्व १८ विषय खेळीमेळीत मंजूर करण्यात आले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!