उद्या समारोप; महाप्रसादाचे आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
येथील राधाकृष्ण मंदिरात राधाकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित भागवत सप्ताह सध्या उत्साहात पार पडत असून, याला भाविक भक्तांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या सप्ताहाचा समारोप आज मंगळवार, २२ जुलै रोजी महाप्रसादाने होणार आहे.
श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण : या सप्ताहात दररोज सकाळी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण साताऱ्याचे प्रसिद्ध वेदमूर्ती आशुतोष रानडे करीत आहेत, तर दुपारी कथाकथनाचे सत्र डॉ. विनायक गरुड यांच्या मधुर वाणीतून रंगत आहे. या कथांमध्ये वराह, नरसिंह, मत्स्य, राम आदी विविध अवतारकथा, तसेच १८ जुलै रोजी श्रीकृष्ण जन्म, १९ रोजी रुक्मिणी स्वयंवर, तर २० रोजी सुदाम्याचे पोहे या कथा विशेष आकर्षण ठरल्या.
तब्बल २०० वर्षांची परंपरा : कराडमध्ये भागवत सप्ताहाची परंपरा तब्बल २०० वर्षांची असून, पूर्वी अनेक मंदिरांमध्ये हा सप्ताह भरत असे. सध्या आषाढ महिन्यातील पर्वकाळात कृष्णा-कोयनेच्या संगमावरील कृष्णामाई घाटावर वसलेल्या वेदशास्त्र संपन्न कै. बाळकृष्णमामा गरुड यांच्या राधाकृष्ण मंदिरात गेली पाच वर्षे हा सप्ताह सातत्याने आयोजित होतो आहे.
सहभाग : या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी कराड कन्यागत महोत्सव समिती, जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व राधाकृष्ण देवस्थान ट्रस्ट यांचे कार्यकर्ते सेवाभावी भावनेने सहभागी झाले. या सप्ताहाच्या समारोपानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गरुड यांनी केले आहे.
