भाग सहा :
मनात आणि हृदयात साठवलेले स्वप्न साकार झाले होते. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची आस पूर्ण झाली होती आणि आता परतीच्या प्रवासाला आरंभ झाला होता. परंतु तत्पूर्वी आणखी एक प्रसंग घडला होता. शिवसेनेतील आणखी एका तोलामोलाच्या नेत्याची आमची भेट झाली होती. मात्र ती व्यक्ती, त्यांच्या सोबत जुळलेले ऋणानुबंध पुढील भागात अधोरेखित करणार आहे.
आमच्या सगळ्यांच्या सायकल वरती भगवे झेंडे दिमाखात फडकत होते. आम्ही पनवेल सोडून पुढे निघालो आणि एक चारचाकी वाहन आम्हाला पाहून थांबले. त्यातून उतरून खाली आलेल्या व्यक्तीने आम्हाला थांबवले. शिवसैनिक आहात का? हो! आमचे उत्तर ऐकून कुठून आलात व कुठे निघालात अशी विचारणा झाली. मग सगळे वृत्त आम्ही थोडक्यात कथन केले. ते ऐकून ती व्यक्ती म्हणाली, *”खंबाटकी घाटाच्या आधी माझे हॉटेल किंवा धाबा (वृंदावन) आहे तिथे तुम्ही जेवणासाठी थांबा”.*
ठरल्याप्रमाणे आम्ही तिथे पोहोचलो आणि त्या व्यक्तीने मोठ्या आदरातिथ्याने स्वागत केले. यथासांग भोजन झाले आणि आम्ही बिल विचारताच त्या व्यक्तीने पैसे घेण्यास नकार दिला. *”तुम्ही इतक्या लांबून साहेबांची भेट घेण्यासाठी आलात व भेट झाली देखील हेच मला पुरेसे आहे”.* तिथून बाहेर पडण्याआधी त्यांनी आम्हाला ग्लासभरून दूध प्यायला दिले. (खर म्हणजे जबरदस्तीने प्यायला लावले.)
पहा! *पैशापुढे माणुसकीचा विजय झाला होता.* असे बरेच अनुभव आम्हाला या प्रवासात येत होते. कराड पर्यंतचा प्रवास सुरू होता. रात्रीच्या सुमारास थंडी अंगाला बोचत होती. पहाटेच्या सुमारास सायकल चालवणे म्हणजे मोठे दिव्यच होते. यथावकाश कराडच्या दिशेने आमची वाटचाल सुरु होती. काशीळ, उंब्रज मागे पडले आणि जुन्या पुलावरून आमच्या सायकली दैत्यनिवारणी मंदिराच्या परिसरात दाखल झाल्या. मग आम्ही तिथेच थांबलो व घरच्या मंडळींना आम्ही आल्याचा निरोप पाठवला.
आपली मुले सुखरूप परत आली आहेत हे समजताच घरची मंडळी आणि त्यांच्या समवेत आणखीही बरीच मान्यवर मंडळी आमच्या स्वागतासाठी हजर झाली. त्यामध्ये सर्वश्री बाळासाहेब उमराणी, सुनिल शिंदे (विभाग प्रमुख होते), शशिकांत हापसे, विजयसिंह पाटील, बंडा कुंभार शिवाय अलंकार, भास्कर, विजय, विक्रांत यांच्या मातोश्री व इतर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
या ठिकाणी सर्वांनी आमचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. आमचे औक्षण करून पेढे भरविण्यात आले आणि आम्ही सगळे एकत्र सोमवार पेठेत दाखल झालो.
पुढे कित्येक दिवस आम्हाला एकूणच प्रवास, साहेबांची भेट कशी झाली याची अनेकजण चौकशी करत होते. आम्हालाही सगळा वृत्तांत सांगताना अभिमान वाटत होता. दिवस सरत होते आणि नवीन वर्ष म्हणजे १९९१ साल सुरू झाले आणि आम्ही पुन्हा एकदा २० जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने सायकलनेच प्रवास सुरु केला. फक्त यावेळी माझ्या सोबत बंडा कुंभार, प्रकाश बैरागी, नितीन मोरे यांचा सहभाग होता. हा प्रवास देखील अविस्मरणीय झाला त्याचे प्रमुख कारण म्हणजे……
आम्ही बरोबर २३ जानेवारी या दिवशी मातोश्रीवर दाखल झालो होतो. आज कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा तपासणी झाली नाही आणि साहेब मातोश्रीच्या ज्या हॉलमध्ये बसले होते तिथे आम्हाला प्रवेश मिळाला. त्यांच्या समोरच्या टेबलावर केक ठेवले जात होते आणि साहेब ते माँ साहेब मीनाताई यांच्या हाती सोपवत होते. स्वतः माँ साहेब आलेल्या शिवसैनिकांना सोफ्यावर बसायला सांगून केक व इतर पदार्थ खाण्यासाठी देत होत्या.
हा सगळाच सोहळा आनंद पसरवत होता. पुन्हा एकदा आमची साहेबांशी समक्ष भेट घडत होती ते क्षण आमच्या नजरेत साठवत होतो आणि तिथेच असलेला कॅमेरामन ते कॅमेऱ्यात टिपत होता. आमच्या समवेत साहेबांनी फोटो काढले. तो दुर्मिळ ठेवा आमच्या हाती लागला देखील पण नियतीला ते मान्य नसावे. पुढे कराडला आल्यावर त्या फोटोच्या कॉपी करायचे ठरवले होते पण कुणाकडून तरी तो फोटो गहाळ झाला. नेमके काय झाले हे इथे न सांगणेच बरे!
अशा प्रकारे सलग दोन वर्षे आम्ही कराड ते मुंबई असा परतीचा प्रवास केला होता आणि शिवसेना प्रमुखांची समक्ष भेट घेण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले होते.
क्रमश :












