भाग पाच :
आज आमच्या आनंदाला जणू उधाण आले होते. सायकल चेंबूरच्या दिशेने तर मन पाखरू आकाशाला गवसणी घालण्यासाठी धावत होते. चेंबूरला पोहचताच आधी आम्ही आमदार श्री. महाडिक यांचे घर गाठले. आज ते घरीच होते त्यामुळे *जय महाराष्ट्र!* म्हणून आम्ही घरात प्रवेशकर्ते झालो.
आमच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला आनंद पाहून त्यांनाही *’काय झाले आहे’* हे ऐकण्याची उत्सुकता लागली होती. चहापान झाले आणि आम्ही आज घडलेली घटना कथन केली. *कोणत्याही परिचय पत्राशिवाय शिवसेना प्रमुखांची आमची भेट झाली होती. इतकेच नव्हे तर उद्या सकाळी ११ वाजता सेनाभवनला आम्हाला पुन्हा भेटीसाठी बोलावले आहे* हे ऐकून त्यांनाही आनंद झाला. अर्थातच आग्रहाचे रात्रीचे भोजन त्यांच्याच घरी करून आम्ही परत मुक्कामी फ्लॅटवर आलो.
आज कुणाचाच डोळा लागत नव्हता. आता उद्या नेमके काय होईल याच विचारात आम्ही विसावलो होतो. त्यावेळी मोबाईल फोन असते तर? दादरला सेनाभवनला जायचे म्हणजे जागोजागी थांबून रस्त्याची (मार्गाची) चौकशी करत जावे लागणार होते. त्यामुळे पहाटे लवकरात लवकर निघूया असे ठरवून आम्ही आमच्या स्वप्न रंजनात निद्रिस्त झालो.
पहाटे जाग येताच आवरून आम्ही सायकलवर आरूढ झालो. आजचा दिवस काही वेगळाच अनुभव देत होता. आजची दिशा वेगळी होती आणि उद्दिष्ट देखील भिन्न होते. ११ च्या आधी सेनाभवन गाठायचे होते त्यामुळे पायांना न कळत गती मिळाली होती. मुंबईच्या आणि विशेषतः धारावीच्या त्या वर्दळीतून आणि वाहनांच्या गर्दीतून आमची सायकल वाट काढत होती. प्रत्येक वळणावर थांबून मार्गाची चौकशी करावी लागत होती.
पण *सर्व अडचणी व अडथळे पार करण्याची आमची इच्छाशक्ती प्रबळ* होती. त्यामुळे तर १०.३० च्या सुमारास आम्ही सेनाभवनला पोचलो होतो. त्यावेळी सेनाभवन म्हणजे शिवसैनिकांना मंदिरच असायचे. त्यामुळे आधी बाहेरूनच आम्ही कळसाचे दर्शन घेतले व सगळे मंदिर न्याहाळत डोळ्यात साठवून घेतले.
त्या मंदिराच्या वास्तूला मनोमन नमन करत आम्ही आत प्रवेश केला. तिथे उपस्थित असलेल्या रक्षकाने चौकशी केली आणि *’साहेबांनी आम्हाला भेटीसाठी बोलावले आहे’* असे सांगताच त्याने *जय महाराष्ट्र!* करत आम्हाला साहेबांच्या वरील मजल्यावर असलेल्या कक्षाच्या द्वारात आणून उभे केले. आज आणखी एक विशेष गोष्ट लक्षात येत होती आणि ती म्हणजे इतर कुणी फारसे अभ्यागत दिसत नव्हते. थोडक्यात सांगायचे झाल्यास गर्दी नव्हती. आम्ही आत डोकावून पाहिले तर तिथे पोलीस, सुरक्षा रक्षक व प्राथमिक माहिती घेऊन तपासणी सुरू असते असे लक्षात आले.
आता आम्ही आणखी एक पायरी ओलांडली होती. प्रत्येकाचे नाव, पत्ता लिहून घेतला गेला आणि आता अंग तपासणी सुरू झाली. इथे एक गंभीर पण गंमतीशीर गोष्ट घडली. आमच्या सगळ्यांची तपासणी झाली आणि विजय उंडाळकर (दाद्या) त्याच्या कमरेला हात लावून सुरक्षा रक्षक मोठ्या आवाजात म्हटला, *”काय आहे? बाहेर काढ”.* आमच्या नजरा मागे वळल्या होत्या. काही तरी विपरीत घडले की काय असेच भाव आमच्या चेहऱ्यावर उमटले. *दाद्याने (विजय उंडाळकर) तितक्याच सहजपणे कमरेला हात घातला आणि कमरेला लावलेली बुलेटची चेन बाहेर काढून त्या रक्षकांच्या हाती सोपवली देखील.*
त्याने देखील ती हातात घेऊन डेस्कवर ठेवून दिली. *”ही कशाला आणली आहे”* या प्रश्नावर आम्ही कराडवरून सायकलवर आलो आहोत व सुरक्षेसाठी ठेवली होती असा खुलासा केला त्यावर त्या रक्षकाने, *”परत जाताना ती घेऊन जा”* असे अगदी हसतमुखाने सांगितले. आम्ही सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
तपासणीची पायरी पूर्ण झाली आणि साहेब होते त्या खोलीत (चेंबर किंवा केबिन, मिटिंग हॉल असेही म्हणता येईल) आता आम्हाला प्रवेश करायचा होता. आज आणखी एका गोष्टीने आम्हाला अचंबित केले. आम्ही इथे पोहचण्या आधीच साहेब सेनाभवनला दाखल झाले होते.
*मला वाटते आजच्या राजकीय नेते, शासकीय अधिकारी व इतर सर्व महत्वाच्या मान्यवरांनी बाळासाहेबांचा हा विशेष गुण अंगीकार केला पाहिजे.* असो! कार्यकर्ते भेटीला येण्याआधीच पक्षप्रमुख किंवा नेते वेळे आधी उपस्थित राहू शकतात ही गोष्ट निश्चितच शिकण्यासारखी आहे. असो!
त्या प्रशस्त खोलीत आम्ही एका पाठोपाठ दाखल होत गेलो. छोट्याशा उंचवट्यावर लांबसडक टेबल व मागील बाजूस खुर्चीवर अगदी मध्यभागी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब विराजमान झाले होते. समोरच्या बाजूला खुर्च्या ठेवलेल्या होत्या. त्यावर आम्हाला बसण्याची व्यवस्था होती. आम्ही ते दृश्य न्याहाळत नजरेत साठवत होतो. साहेब एकटे नव्हते. त्यांच्या एका बाजूला श्रीमान मनोहर जोशी, दुसऱ्या बाजूला श्रीमान सुधीर जोशी, श्रीमान लीलाधर डाके, श्रीमान गजानन कीर्तिकर अशी सेनेची वरिष्ठ नेते मंडळी बसलेली होती.
साहेबांनी आमच्याकडे पाहून चौकशी सुरू केली. आधी प्रत्येकाने स्वतःचे नाव सांगितले आणि नंतर सेनेत असेलेल्या पदाची ओळख करून दिली. खर सांगायचे तर आम्हा सगळ्यांची मूर्ती (अंगकाठी) तशी बेताचीच आणि वयाची फार तर विशी ओलांडलेली. त्यामुळे कराड ते मुंबई हा सायकल प्रवास आम्ही करू किंवा केला असेल यावर कुणाचाही लगेच विश्वास बसत नव्हता.
पण साहेबांनी ज्या आपुलकीने, आस्थेने चौकशी सुरू केली ती ऐकताना आमच्या अंगावर शहारे उभे राहिले होते. साहेब विचारत होते, *”कधी निघालात? कुठे कुठे थांबलात? वाटेत काही अडचण तर आली नाही ना? जेवण कुठे घेतले? कुणाला काही त्रास तर झाला नाही ना?”.*
या प्रश्नातून आमच्या शिवसेना प्रमुखांना *”साहेब”* असे संबोधन करणे किती सार्थ होते याची जाणीव झाली. कराडमधील शिवसेनेची उभारणी कशी सुरू आहे व इतर काही प्रश्नोत्तरे झाली आणि साहेब मनोहर जोशी यांच्याकडे मान वळवून म्हणाले, *”मनोहर या युवा सैनिकांकडे बघा, म्हणजे मी काय पेरले आहे किंवा निर्माण केले आहे हे तुमच्या लक्षात येईल”.*
श्री. मनोहर जोशी व इतर नेते फक्त निरुत्तर होऊन ऐकत होते. ते ऐकून आमचा ऊर अभिमानाने भरून गेला होता.
पुन्हा एकदा आमची विचारपूस सुरू झाली. *”आता परत कसे जाणार आणि सर्वात शेवटी पैसे आहेत का? तुमच्या जवळ खर्चाचे पैसे आहेत की देऊ? प्रवासात काळजी घ्या आणि माझ्याकडून आणखी काही हवे आहे का?”.
*साहेबांनी ज्या आपुलकीने आमची विचारपूस केली ती ऐकताना डोळे पाणावत होते.
*”साहेब आम्हाला काही नको फक्त तुमच्या सोबत एक फोटो घ्यायचा आहे”.*
अरे इतकेच होय, कॅमेरा आहे का? मी होकार दिला. तसे साहेब सुधीर जोशी यांना म्हणाले की, *”सुधीर तू फोटो काढ”.*
साहेब व इतर नेते खुर्चीतून उठून खालील बाजूस येऊन उभे राहिले व आम्हाला त्यांच्या सोबत उभे करून घेतले. श्री. सुधीर जोशी यांनी कॅमेरा घेतला आणि थोडे मागे जाऊन फोटो काढण्यासाठी सज्ज झाले. एक *’क्लिक’* असा आवाज झाला आणि त्याचक्षणी साहेबांनी म्हटले, *अरे सुधीर फ्लॅश पडला नाही रे”.*
त्यांनी म्हटले, *साहेब या कॅमेऱ्यात फ्लॅश नाही हो”.*
हे ऐकताच साहेबांनी म्हटले,
*”अरे तो कराडचा कॅमेरा आहे त्याला फ्लॅश कसा असणार?”.*
साहेबांच्या या उत्तराने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. (साहेबांच्या भाषेतील सहजपणा, खुमासदार शैली आणि तत्परता आजही थक्क व्हायला लावते) आता सगळे परत स्थानापन्न झाले परत एकदा आम्ही साहेबांना पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि तिथून बाहेर पडलो.
(कॅमेऱ्याला फ्लॅश नसेल तर एखाद्या खोलीत, कमी उजेडात फोटो येत नाहीत याची जाणीव कराडला आल्यावर आणि श्रोत्री यांच्या कडे फोटो डेव्हलप करायला दिले तेव्हाच आम्हाला झाली.)
जवळपास एक तास आम्ही साहेबांच्या सोबत होतो. बाहेर पडताच सुरक्षा रक्षकाने आधी ती बुलेटची चेन दाद्याच्या हातात दिली. आम्ही हसतमुखाने सेनाभवनच्या पायऱ्या उतरलो. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता आणि तो सफल संपूर्ण देखील झाला होता.
क्रमश :












