भाग चार :
नित्यनेमाने उजाडणारा प्रत्येक दिवस आपल्या जीवनात काही नवीन घटना घडवून आणत असतो. कोणत्या दिवशी नेमके काय घडेल याची तिळमात्र देखील कल्पना आपण करू शकत नाही. इतकेच नाही तर आजच्या दिवशी आपण कुणाला किंवा कोण आपल्याला भेटेल याचीही खात्री देता येत नाही.
*”कालचेच पाढे पंचावन्न”* या उक्तीप्रमाणे आज पुन्हा नव्या उमेदीने कलानगरच्या प्रवेश द्वारातून मातोश्रीच्या बाहेर (विजय, अलंकार, विक्रांत, भास्कर) पोचलो. त्यावेळी देखील आज जे घडणार आहे त्या विषयी आम्ही सगळेच पूर्णपणे अनभिज्ञ होतो. मनात विचारांचे काहूर थैमान घालत होते. सुरक्षा रक्षक म्हणतात त्याप्रमाणे आपण साहेबांच्या भेटीची वेळ तर घेतली नाही आणि आमदार श्री. महाडिक साहेबांनी पण तसे काही सांगितले नाही. आपल्या जवळ कुणाही नेत्याचे ओळख पत्र किंवा शिफारस पत्र देखील नाही. फक्त *’आम्ही शिवसैनिक आहोत हेच एक सर्टिफिकेट’* आमच्या जवळ होते. पण केवळ तेव्हड्यावर साहेबांची भेट मिळू शकेल का?
आजही सुरक्षा रक्षका समवेत तीच प्रश्नोत्तरे झाली. पण बहुतेक त्यांच्या मनात आमच्या विषयी थोडा ओलावा निर्माण झाल्याचे दिसत होते. इतक्या लांबचा प्रवास सायकलवरून करून ही मुले फक्त साहेबांची भेट घ्यावी म्हणून इथपर्यंत आली आहेत आणि रोज न थकता, दमता इथे येऊन दिवसभर रेंगाळत आहेत याचे त्यांनाही अप्रूप वाटत होते.
*”आज साहेब मातोश्री मध्ये आहेत पण कुणाचे शिफारस पत्र असेल तर त्यांची भेट लगेच होऊ शकते”* असे त्यांनी सूचित केले. आता मात्र आमची पुरती भंबेरी उडाली आणि थोडी हताशा व निराशा झाली. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. मनाची मरगळ झटकून आम्ही सगळा दिवस तिथेच रेंगाळत राहिलो. संध्याकाळ होत होती. साधारण ६ वाजून गेले होते आणि……
त्या सुरक्षा रक्षकांची अचानक धावपळ सुरू झाली. आम्हाला एका बाजूला उभे राहण्याची सूचना करून सुरक्षा रक्षक मुख्य गेटच्या (मातोश्रीच्या) दिशेने धावले आणि गेटच्या जवळ जाऊन उभे राहिले. नेमके काय घडते आहे व आपण काय करायचे हा विचार स्पर्श करतो न करतो तोच गेटचे दार उघडले गेले आणि आम्ही डोळे विस्फारून समोरचे दृश्य न्याहाळू लागलो…..
*आमचा स्वतःच्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता……आमचे दैवत असलेले साहेब गेटमधून बाहेर पडत होते…. त्यांच्या पाठीमागे माँ साहेब मीनाताई ठाकरे आणि त्यांच्या पाठोपाठ बहादूर थापा (जे साहेबांची अखेरपर्यंत सोबत करत होते) असे तिघेही गेटमधून बाहेर पडले…..*
….. अवघ्या काही क्षणांची घडामोड आणि तेव्हड्यात सुरक्षा रक्षकाने एका बाजूला उभे राहून नेमके काय घडते आहे हे डोळे विस्फारून पाहत असलेल्या आम्हा सगळ्यांना पुढे येण्याची खूण केली……
सगळेच इतक्या क्षणार्धात घडत होते की *”आम्हाला जणू स्वर्गात प्रवेश* मिळाल्याचा भास होत होता. आम्ही जणू *कल्पवृक्षाच्या छायेत उभे आहोत आणि सगळ्या मनोकामना पूर्ण होत आहेत”* अशीच काहीशी स्थिती होती…..
आम्ही एक एक जण पुढे होऊन साहेबांचा पदस्पर्श करून दर्शन घेतले आणि म्हटले…..
*”साहेब आम्ही तुमच्या दर्शनासाठी कराडमधून सायकलवरून इथे आलो आहोत”.*
आता साहेबांचे शब्दध्वनी कानावर पडले….
*”अरे माझे काय दर्शन घ्यायचे? दर्शन घ्यायचेच असेल तर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे”.*
आम्ही काय बोलणार यावर? आमच्या मनातील भावना डोळ्यात साठल्या होत्या आणि डोळ्याच्या पापण्या न कळत ओलावल्या होत्या. सगळे फक्त साहेबांच्या भोवताली असणाऱ्या तेजोमय वलयाने प्रभावित झालो होतो. बोलायला शब्द होतेच कुठे? सगळेच निःशब्द व निस्तब्ध उभे होतो आणि परत साहेबांचे शब्द कानावर पडू लागले……
*”अरे तुम्ही इतक्या लांब फक्त मला भेटायला सायकलवरून आला आहात हे मला कुणीच कळवले नाही. नाही तर तुम्हाला एवढा वेळ वाट पहावी लागली नसती. या आधीच मी तुम्हाला भेटलो असतो. पण मी आता बाहेर जात आहे. पण तुम्ही उद्या सकाळी ११ वाजता सेनाभवनला या मी तुम्हाला भेटेन”.*
आता साहेब वाहनात बसून मार्गस्थ झाले आणि आम्ही आमच्या सायकलकडे वळलो. *’आपली मोहीम फत्ते झाली’* याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. अंगात एक वेगळेच चैतन्य संचारले होता. *डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर हसू आणि हृदयात आनंदाला उधाण आले होते.* फक्त एक किंचितशी जाणीव जागी होती. कदाचित आनंदाच्या लाटेत आम्ही नाचू नये असेच ती सूचित करत होती. ‘आता पर्यंत झालेल्या कष्टाचे सर्वार्थाने सार्थक झाले होते’. आम्ही त्या सर्व सुरक्षा रक्षकांचे अगदी मनापासून आभार मानले. त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक समाधानाची छटा पसरली होती. एका वेगवेगळ्याच ऊर्जेने भारून आज आमच्या सायकली वाऱ्याशी स्पर्धा करत चेंबूरच्या दिशेने धावत होत्या आणि आता प्रतिक्षा होती उद्या सकाळी सेनाभवनला होणाऱ्या साहेबांच्या भेटीची!
क्रमश :












