आषाढीला आवळ्यांतून अवतरले विठ्ठलरूप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराडचे डॉ. राजेंद्र कंटक यांची आगळीवेगळी कलाकृती 

राजेंद्र मोहिते/कराड : –

शहाण्यांच्या मते “कला ही अनुभूती आहे”, आणि ही अनुभूती जेव्हा सृजनशीलतेच्या पातळीवर जाऊन नवे सौंदर्य घडवते, तेव्हा ती केवळ कला राहत नाही, ती उपासना होते. अशीच एक अनोखी कला-उपासना आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी अनुभवायला मिळाली ती डॉ. राजेंद्र अंजली अरविंद कंटक यांच्या रूपाने!

देवमूर्तीतून निसर्गाशी साधला आत्मीय संवाद : वैद्यकीय सेवा आणि चित्रकला यांचा सुरेख संगम साधणारे डॉ. कंटक यांनी यंदा आषाढी एकादशीनिमित्त आपल्या बागेतील पडलेल्या आवळ्यांच्या फळांमधून तब्बल ६ फूट x २ फूट आकाराचे विठ्ठलरूप साकारले. त्यांच्यासाठी पडलेली फांदी ही केवळ निसर्गाची कृती नव्हती, तर ती होती साक्षात प्रेरणा! त्या क्षणिक वेदनेतूनच साकारलेली ही देवमूर्ती म्हणजे निसर्गाशी साधलेला एक आत्मीय संवाद होता.

कराड : विठ्ठलरूप साकारताना कलासैनिक डॉ. राजेंद्र अंजली अरविंद कंटक.

वर्ल्ड, लिम्का, आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद : चित्रकलेत अफाट योगदान देणाऱ्या डॉ. कंटक यांचे नाव आधीपासूनच वर्ल्ड, लिम्का, आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. त्यांनी फक्त पेन्सिलच्या साहाय्याने काढलेली 35,000 हून अधिक चित्रे ही त्यांच्या समर्पित तपश्चर्येची साक्ष आहेत. विशेषतः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर रेखाटलेल्या 750 चित्रांनी रसिकांना भावविवश केलं आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली आहे.

व्यक्तिमत्त्वांचे चित्रण : राजकारण, समाजसुधारणा आणि अध्यात्म या तिन्ही क्षेत्रांतील द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांचे चित्रण डॉ. कंटक यांनी आपल्या कुंचल्यातून जिवंत केलं आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कराड इत्यादी ठिकाणी त्यांनी 100 हून अधिक चित्रप्रदर्शने भरवली असून, त्यांच्या बाळासाहेबांवरील चित्रप्रदर्शनाला खुद्द उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनीही भेट दिली आहे.

संपूर्ण घरालाच बनवले कलामंदिर :  चित्रकलेबरोबरच मूर्तीकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, बागकाम आणि लाकडावरील नक्षीकाम यांतही त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या संपूर्ण घरालाच एक कलामंदिराचं स्वरूप दिलं गेलं असून, बाळासाहेबांसाठी स्वतंत्र दालन त्यांनी आपल्या घरात उभारलं आहे. ही कला म्हणजे केवळ शोभा नव्हे, तर ती आहे श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि सौंदर्यदृष्टी यांची एकात्मता.

नवोदितांसाठी दीपस्तंभ : ३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा देताना कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा जपणाऱ्या डॉ. कंटक यांचं कार्य हे नवोदितांसाठी एक दीपस्तंभ ठरत आहे. आज त्यांची ओळख केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘कलासैनिक’ म्हणून होते आहे.

नैसर्गिक, श्रमसाध्य आणि अंतर्मनातून जन्मलेली कला : आजच्या घडीला, जेव्हा डिजिटल युगात कला ‘फिल्टर’च्या मर्यादेत अडकते आहे, तेव्हा डॉ. कंटक यांची ही नैसर्गिक, श्रमसाध्य आणि अंतर्मनातून जन्मलेली कला म्हणजे खऱ्या अर्थाने विठ्ठलभक्तीची साकार प्रतिमा ठरते. त्यांच्या या अनोख्या कलेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!