भाग दोन :
कराड ते मुंबई हा प्रवास, तो ही सायकलवरून म्हणजे मोठे दिव्यच की! त्यावेळी हा सगळा दुहेरी मार्ग आणि चारचाकी, अवजड वाहनांची वर्दळ यांमुळे हा मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा असेच समजले जाई. जिथे रस्ताच अरुंद तिथे अन्य सोई-सुविधा तरी कुठून असणार? त्या काळात *हॉटेल/ढाबा संस्कृती* फोफावली नव्हती. फक्त चहाची टपरी व मोजकीच छोटी हॉटेल होती. शिवाय आमच्या सगळ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच! त्यामुळे *पोटासाठी खिशाला चिमटा काढणे* परवडणारे नव्हते. साहजिकच पहिल्या दिवशीचे उदरभरण घरून घेतलेल्या डब्यावरच पार पडणार होते. अर्थात *त्या काळात पैशापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व होते* आणि त्याची प्रचिती आम्ही घेतच होतो.
वाटेत कुठलीही अडचण आली तरी, घरच्यांशी संपर्क साधण्याची कोणतीही सुविधा नव्हती. घरातून बाहेर पडलेली मुले कधी परत येतील याची शाश्वती नव्हती. या बाबतीत *आमच्या सगळ्यांच्या घरच्यांनी जे धैर्य, संयम दाखविला त्याला शब्दात व्यक्त करता येईल का?* तेच आज सर्व प्रकारच्या सुविधा असतानाही मुलांच्या काळजीने व्याकूळ होणारे आप्तस्नेही पाहिले की नकळत हसू येते. असो!
सायकलचे पायडल मुंबईच्या दिशेने धावू लागले. मनाचे पाखरू कल्पनांच्या हिंदोळ्यावर आधीच स्वार झाले होते. *”साहेबांची समक्ष भेट होणार”* या एकाच विचाराने दौडत होते. शरीराला येणारा थकवा मनाच्या उभारीने जाणवू देत नव्हता.
पहिल्याच दिवशी आम्ही कराड ते पुणे हा प्रवास पूर्ण केला. साधारणपणे १२ तास इतक्या कालावधीत आम्ही पुण्यात पोचलो होतो. आपण इतके तास सायकल चालवू शकतो किंवा शकलो यावर आमचाच विश्वास बसत नव्हता. या प्रवासात कुठेही अडचण, अडथळा आला नाही. एक मात्र खरे की त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असणारी गर्द वनराई आम्हाला जणू छत्रछाया धरत होती. आता चार/सहापदरी महामार्ग झाला पण ती छत्रछाया मात्र हरपली याचा निश्चितच खेद वाटतो!
पुण्यात भास्कर थत्ते यांचे स्नेही डेक्कनला होते आणि त्यांच्या घरीच आमची रात्रीची राहण्याची व्यवस्था झाली. विश्रांती घ्यावी म्हणून जेव्हा पाठ जमिनीवर टेकली तेव्हा पाय आणि पाठ या अवयवांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणिव करून दिली. शरीर थकले होते पण मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पहिल्याच दिवशी आपण एवढी मजल मारली याचा अभिमानही वाटत होता.
रात्री कधी निद्राधीन झालो आणि पहाट उजाडली ते समजलेच नाही. पुणे ते मुंबई हा मार्गही खडतरच होता. त्यातही खोपोलीचा घाट म्हणजे जीवावरचा खेळ! पण तो खेळावाच लागणार होता आणि तो देखील सायकलवरून!! पुणे मागे पडत चालले आणि आता मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. लोणावळा देखील पार पडला आणि पायडल व पाय दोघांनाही विश्रांती मिळाली. आता फक्त ब्रेक लावणे व तोल सांभाळणे इतकेच करायचे होते. तो भव्यदिव्य घाट, एका बाजूला उंच डोंगर आणि दुसरीकडे खोलवर पसरलेली दरी….. *अनुभवाची शिदोरी स्वतःलाच बांधावी लागते* हेच खरे!
रस्ता आणि ठिकाणे मागे पडत होती आणि परत एकदा सलग दुसऱ्या दिवशी १२ तास प्रवास करत आम्ही नवी मुंबई येथे पोहचलो. तेथे *श्री. संपत शेवाळे* (नंतरच्या काळात ते आमदार झाले) यांनी आमची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. तिथेच मुक्काम ठोकला आणि दुसऱ्या दिवशी मुंबईच्या वेशीवर चेंबूरच्या हद्दीत प्रवेश केला. प्रशस्त चौकात डाव्या हाताला सुप्रसिद्ध आर.के. स्टुडिओची वास्तू तितक्याच दिमाखात उभी होती. तिथेच आम्ही आमदार श्री. सूर्यकांत महाडिक यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी चौकशी सुरू केली. त्याच वेळी आमची नजर उजवीकडे असणाऱ्या शिवसेनेच्या शाखेकडे वळली.
कोणताही विचार न करता आम्ही तिथेच सायकल लावून शाखेच्या छोटयाशा कार्यालयात प्रवेश केला. *जय महाराष्ट्र!* हीच स्वतःची ओळख सांगण्याची व स्वागताची परंपरा आणि शिवसैनिक असण्याचे ओळखपत्र होते व आजही आहे. आत शाखाप्रमुख *श्री. तुकाराम काते* (नंतर ते विधानसभा आमदारही झाले) हे खुर्चीत विराजमान होते. त्यांनी मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले व बसण्याची विनंती केली. सगळी चौकशी झाली आणि त्यांनी आज तिथेच शाखेच्या वरील बाजूस असलेल्या छोट्या खोलीत आमची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था केली.
उद्या सकाळी आपण आमदार साहेबांच्या घरी भेटायला जाऊ असे त्यांनी सांगितले आणि आम्ही निश्चित झालो झालो. पण मनात ओढ लागली ती आमदार महाडिक यांच्या घरच्या भेटीची आणि अर्थातच मनात हुरहूर लागली ती मा. हिंदुहृदयसम्राट साहेबांच्या भेटीची!
*क्रमशः*












