पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. अशोकराव गुजर यांची माहिती; १७ सप्टेंबर रोजी कराड येथे सन्मान, उद्योग व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील कार्याचे गौरव

कराड/प्रतिनिधी : –

भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष, फोरम अँड सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सचे संस्थापक अध्यक्ष आणि जागतिक स्तरावरील उद्योजक पद्मभूषण बाबासाहेब एन. कल्याणी यांना यंदाचा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी दिली.

पत्रकार परिषद : ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य दिलीपभाऊ चव्हाण, राजेंद्र माने, संयोजक समिती सदस्य अल्ताफहुसेन मुल्ला व सौ. शोभाताई पाटील उपस्थित होते.

पुरस्काराचा उद्देश : आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान गेली तीन दशके कराड परिसरात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. कराड नगरीचे सलग ४२ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहणारे स्व. पी. डी. पाटीलसाहेब हे लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी प्रतिष्ठानने सन २०११ पासून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची सुरुवात केली. या पुरस्काराचा उद्देश महाराष्ट्राची कीर्ती जगभर नेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणे हा आहे.

पुरस्काराचे मानकरी : या पुरस्काराचे पहिले मानकरी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते. त्यानंतर डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. अभय बंग, कु. नसिमा हुरजूक, डॉ. शा. बं. मुजुमदार, डॉ. रणजित जगताप, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. चंद्रकांत लोखंडे, डॉ. जेष्ठराज जोशी आणि श्री. अरुण जोशी यांचाही समावेश या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये होतो.

उल्लेखनीय कार्याची दखल : डॉ. अशोकराव गुजर म्हणाले, प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुरस्कारासाठी बाबासाहेब कल्याणी यांची निवड करण्यात आली. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले असून, संरक्षण उत्पादन, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील सहभागासाठी त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. ते विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांचे सदस्य आहेत.

पुरस्कार प्रदान सोहळा : दि. १७ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात स्व. पांडुरंग दादासाहेब (पी. डी.) पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त, कराड येथे बाबासाहेब कल्याणी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असून रुपये ५० हजार रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!