आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची विधानसभेत मागणी; योजनांना तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे अडथळे
कराड/प्रतिनिधी : –
राज्यात शेतकऱ्यांनी सहकार तत्वावर सुरू केलेल्या उपसा जलसिंचन योजनांना नवी उर्जा मिळवून देण्यासाठी या योजनांचा समावेश केंद्र शासनाच्या ‘जलद सिंचन लाभ कार्यक्रमात’ करावा, अशी ठाम मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आज राज्य विधानसभेत केली.
पावसाळी अधिवेशनात फोडली वाचा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार डॉ. भोसले यांनी या विषयाला सभागृहात वाचा फोडली.
ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीला चालना : “महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर उपसा सिंचन योजना राबवल्या असल्याचे सांगत डॉ. भोसले म्हणाले, या योजनांमुळे मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली आली असून ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाली आहे.”
सहकारी साखर कारखान्यांचाही पुढाकार : या योजनांची उभारणी करण्यासाठी अनेक ठिकाणी सहकारी साखर कारखान्यांनी देखील पुढाकार घेतला आहे. परिणामी, शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग वाढले असून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
आवश्यक मदत द्यावी : सध्या या योजनांना तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे शासनाने या योजनांचा समावेश केंद्र शासनाच्या ‘जलद सिंचन लाभ कार्यक्रमात’ करून त्यांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी ठोस मागणी आमदार डॉ. भोसले यांनी केली.
… तर, ग्रामीण भागात जलसिंचन क्रांती घडेल : या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. अशा प्रकारच्या योजनांना सरकारी पाठबळ मिळाल्यास, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जलसिंचनाची क्रांती घडेल, असा विश्वास आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
