अशोक चौकातील प्रकार; आठवडाभरात उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
कराड/प्रतिनिधी : –
शहरातील शनिवार पेठ, अशोक चौक परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेज ओव्हरफ्लोच्या समस्येला कंटाळले असून आता त्यांचा संयम सुटू लागला आहे. वारंवार घाण पाणी रस्त्यांवर आणि घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. नगरपालिकेकडून तात्पुरते उपाय करून ही समस्या वर्षभरापासून दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
निवेदन : या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वाहतूक आघाडीचे कराड तालुकाध्यक्ष नागेश कुर्ले यांच्या नेतृत्वाखाली कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सोमवार (दि. ३०) रोजी सदर प्रश्नी लेखी निवेदन देण्यात आले आहे.
सांडपाणी थेट घरांमध्ये : बुरुड गल्ली ते अशोक चौक आणि पटेल बिल्डिंगपर्यंतच्या भागात ड्रेनेज लाईन सतत ओव्हरफ्लो होत आहे. या भागात बैठी घरे अधिक असल्यामुळे सांडपाणी थेट घरांमध्ये शिरते. परिणामी घरातील वयोवृद्ध, महिला आणि लहान मुले यांचे आजाराचे प्रमाण वाढले आहे.
…तर, पालिकेविरोधात तीव्र आंदोलन : “प्रशासन वेळोवेळी तात्पुरते उपाय करत आहे, पण मूळ समस्या कायमची सोडवली जात नाही. गेल्या वर्षभरात अनेक वेळा हा प्रश्न उग्र स्वरूपात समोर आला आहे. यांमुळे नागरिक आता पुरते हैराण झाले आहे. आता जर आठवडाभरात या प्रश्नावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना झाली नाही तर, कराड नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशाराही नागरिकांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाची प्रत सादर : या निवेदनाची प्रत माहितीसाठी आमदार अतुलबाबा भोसले आणि जिल्हाधिकारी, सातारा यांना देण्यात आली आहे.
पालिकेचे अद्याप प्रतिक्रिया नाही : या गंभीर तक्रारीनंतर पालिकेने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, नागरिकांमध्ये वाढत चाललेला असंतोष लक्षात घेता, प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे ठरणार आहे.
निवेदनावरील नावे व सह्या : या निवेदनावर रिपाइ (आठवले गट) वाहतूक आघाडीचे कराड तालुकाध्यक्ष नागेश कुर्ले यांच्यासह जुनेद इनामदार, महेश पाडळकर, निसार मुल्ला, स्वप्नील काटवटे, गणेश शिंदे, जुनेद शिकलगार, नितीन शहा, मंगेश महाडिक, राजेंद्र पवार आदींची नावे व सह्या आहेत.
