आ. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा शेतकरी कामगार पक्षाचा निषेध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल परतूरचे (जि. जालना) आमदार बबनराव लोणीकर यांचा शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ठराव एकमुखी संमत करण्यात आला.

सरकारला सत्तेची झिंग : आ. लोणीकर यांनी नुकतेच एका सभेत “तुमच्या बायका-मुलींचे कपडे आम्ही दीड हजार रुपये देऊन घेतो, पेरणीचे पैसे आम्ही देतो,” असे वक्तव्य केले. या विधानावर तीव्र संताप व्यक्त करताना ॲड. देसाई म्हणाले, “या सरकारला सत्तेची झिंग चढली आहे. सरकारमधील अनेक नेते दररोज शेतकऱ्यांविरोधात अपमानास्पद विधाने करत आहेत. 2014 नंतर शेतकरी सरकारच्या पैशावर पेरणी करतो, असा चुकीचा प्रचार सुरू आहे.”

शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणूक : “शेतकरी बियाणे, खते, औषधे खरेदी करताना जीएसटीच्या माध्यमातून नियमितपणे कर भरत असतो. तरीही त्याला ‘कर न भरणारा’ ठरवून समाजात तुच्छ लेखले जात आहे. ही अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक बाब आहे.”, असेही ॲड. देसाई यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांविषयीचा दृष्टिकोन चुकीचा : 2014 मध्ये सोयाबीनला 6000 रुपये दर मिळत होता, परंतु 2025 मध्ये तोच माल 4000 रुपयांना विकावा लागत आहे, अशी स्थिती आहे. “शेतकरी उत्पादनाला हमीभाव दिला गेला, तर तो कधीही कोणासमोर हात पसरत नाही. पण सरकारचा आणि लोकप्रतिनिधींचा शेतकऱ्यांविषयीचा दृष्टिकोनच चुकीचा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती : या बैठकीस भाई एम. आर. जाधव, भाई दिनकर गुरव, अनिल जगताप, गणेश जगताप, भाई पोपटराव जगताप, ॲड. सयाजीराव कवळे, ॲड. पंडितराव गायकवाड, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सन्मानासाठी लढण्याचा निर्धार : याप्रसंगी सर्वांनी मिळून आ. लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!