अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव

कराड/प्रतिनिधी : – 

शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या भरीव कार्याची दखल घेत, पीएम श्री. कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ चे माजी मुख्याध्यापक, तसेच महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष मा. अर्जुन कोळी यांची महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या कोअर कमेटी सदस्यपदी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी निवड करण्यात आली आहे.

मिपा संस्थेचे कार्य : मिपा संस्था ही नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (निपा) या शैक्षणिक धोरणनिर्मिती संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, शालेय व्यवस्थापन, नेतृत्व विकास आणि प्रशासनाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी राज्यभरात करते. मिपाची कोअर कमेटी ही राज्यभरातील निवडक तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेली सल्लागार मंडळ आहे, जी धोरणात्मक निर्णय, शैक्षणिक उपक्रमांची आखणी व अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करते.

शैक्षणिक व संघटनात्मक योगदान : अर्जुन कोळी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. त्यांनी शिक्षक म्हणून आणि नंतर मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असताना शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले असून, शिक्षक संघटनात्मक कार्यामध्येही त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.

अभिनंदन : या निवडीनंतर राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध शिक्षक संघटना, सहकारी, माजी विद्यार्थी आणि पालक वर्गाने त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुभव व दृष्टीकोन उपयुक्त : या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून कोळी यांचे अनुभव व दृष्टीकोन राज्यातील शाळांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार, असा विश्वास शिक्षणवर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!