आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ४.७० कोटींचा निधी मंजूर
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ ठिकाठिकाणी राबविली जात आहे. याअंतर्गत कराड दक्षिणमधील ११ गावांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी मूलभूत सुविधा : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील ११ गावांमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यासाठी, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे ४ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
गावोगावसाठी मिळालेला निधी : या निधीतून कराड दक्षिणमधील बेलवडे बुद्रुक येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर व कसे वस्तीमध्ये सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करणे (४५ लाख), चचेगाव येथील सिद्धार्थनगर, संत रोहिदासनगर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर (५० लाख), गोटे (३० लाख), गोळेश्वर येथील गणेशनगर, थोरात वस्ती, दुपटे वस्ती, झिमरे वस्ती व झिमरे-साळुंखे वस्ती (६५ लाख), गोवारे (३५ लाख), घोणशी येथील जय मल्हार कॉलनी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (२० लाख), कार्वे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर, संत रोहिदासनगर (५५ लाख), वारुंजी येथील लक्ष्मी वॉर्ड, जिजामातानगर व सिद्धनाथ कॉलनी (५० लाख), विंग येथील समतानगर, संत रोहिदासनगर व पंचशीलनगर (४५ लाख), ओंड (२५ लाख), वहागाव येथील पंचशीलनगर, जय मल्हारनगर, संत रोहिदासनगर, अहिल्यानगर (५० लाख) येथे सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी केली जाणार आहे.
आराखडा व निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश : याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला असून, या विकासकामांसाठी तातडीने आराखडा सादर करुन, निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच या मूलभूत सोयीसुविधांचे काम मार्गी लागून, कराड दक्षिणमधील ११ गावांमधील विविध अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहती हायमास्ट दिव्यांनी उजळणार आहेत.
ग्रामस्थांनी मानले आभार : या निधीबद्दल ग्रामस्थांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
