मनसेच्या आंदोलनानंतर कोल्हापूर नाका खुला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

दादासाहेब शिंगण यांचे भर पावसात आंदोलन; मलकापूर फाटा लवकरच खुला करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

कराड/प्रतिनिधी : –

येथील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांच्या नेतृत्वाखाली तब्बल एक तास खड्ड्याजवळ बसून भर पावसात हे आंदोलन केले.

प्रशासनाकडून तत्काळ दखल : प्रशासनाकडून या आंदोलनाची तत्काळ दखल घेत कोल्हापूर नाका हलक्या वाहनांसाठी खुला केला. तर मलकापूर फाटाही दोन दिवसांत खुला करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

केवळ ७० टक्केच काम पूर्ण : कोल्हापूर नाका येथे गेली तीन वर्षे उड्डाणपुलाचे काम सुरू असून, अद्याप केवळ ७० टक्केच काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी व गटारींची फुटकी झाकणे यांमुळे नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही ठेकेदार व प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने आंदोलनाचे हत्यार उपसले.

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे बळी : यावेळी बोलताना दादासाहेब शिंगण यांनी “ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत पाच नागरिकांचे बळी गेले आहेत. तरीही सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवल्या जात नाहीत. यावर आता गप्प बसणार नसल्याचे प्रशासनास बजावले.

रिक्षा चालकांचाही पाठिंबा : सोमवारी सकाळी एचडीएफसी बँकेसमोर सेवा रस्त्यावरील खड्ड्याजवळ मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. या अचानक झालेल्या आंदोलनाने पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. कोल्हापूर नाक्यावरून शहरात येणारी वाहतूक बंद झाल्यामुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना विशेष त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळाला.

मनसेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा : अखेर ठेकेदार कंपनीचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोल्हापूर नाक्यावर लावलेले सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक हटवले आणि हलक्या वाहनांसाठी रस्ता खुला केला. तसेच दोन दिवसांत मलकापूर फाटाही वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आंदोलनात सहभाग : या आंदोलनात संभाजी चव्हाण, संजय मंडले, शंभूराज भिसे, संजय डिसले, सोनू जाधव, आकाश नलवडे, अरुण मदने, सनी पाटोळे यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!