साताऱ्यात 22 जूनला वितरण; संविधानिक व सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्यांचा होणार गौरव
कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुकाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब शिंगण यांना ‘महालक्ष्मी आधार फाउंडेशन’चा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साताऱ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा होणार गौरव : संविधानिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘महालक्ष्मी आधार फाउंडेशन’च्या वतीने ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळ व ठिकाण : हा सोहळा रविवार (दि. २२) जून रोजी राजवाडा येथील पाठक हॉलमध्ये पार पडणार आहे. पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्यकर्तृत्वाच्या जोरावर समाजात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत फाउंडेशनने त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्याची दखल : सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब शिंगण यांनी कराड व मलकापूर शहर परिसरासह संपूर्ण तालुक्यात आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या श्री. शिंगण यांच्या कार्याची दखल घेत फाउंडेशनने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
कार्यगौरवाचा एक महत्वपूर्ण क्षण : कार्यक्रमाच्या निमित्ताने पुरस्कारप्राप्त मान्यवरांसह त्यांच्या कुटुंबियांनाही उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हा सोहळा त्यांच्या कार्यगौरवाचा एक महत्वपूर्ण क्षण ठरणार असून, त्यांच्या कार्याला एक नवा सन्मान मिळवून देणारा असेल.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ. प्रतिभा शेलार असणार आहेत. याप्रसंगी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
