डाक अधीक्षिका स्वाती दळवी; कराड डाक विभागात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
“रक्तदान हे केवळ श्रेष्ठ दान नसून ते जीवनदान आहे. आजच्या काळात रक्ताची गरज ही केवळ अपघातग्रस्तांसाठी नव्हे; तर अनेक गंभीर आजारांसाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन कराड विभागाच्या डाक अधीक्षिका स्वाती दळवी यांनी केले.
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर : १४ जून या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या डाक विभागामार्फत कराड प्रधान डाकघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेरणादायी उदाहरण : या शिबिराचे उद्घाटन डाक अधीक्षिका स्वाती दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे अधीक्षिका स्वाती दळवी यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
मान्यवरांची उपस्थिती : शिबिराच्या आयोजनावेळी डाक अधिकारी अमृत कुमटकर, अमित देशमुख, पोस्टमास्तर रामलिंग राजमाने, तसेच वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजवर्धन पाटील, सुनिता कुंभार, कुमुदिनी दळवी, नागनाथ केंद्रे, मंगेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद : रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने रक्त संकलनाचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यात आले. या उपक्रमास डाक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रक्तदानाचे कर्तव्य निभावले : चंद्रकांत पवार, महेश लोहारे, सखाराम देवकाते, जी. के. पाटील, शंकर सुतार, श्रीराम शिंदे, सतीश आलमवाड, उमेश मोहिते, नितीन पाटील, अभिजीत जाधव, पांडुरंग निळे, शाहीर सानप यांसह कराड विभागातील अनेक डाक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या सहभागामुळे रक्तदान शिबिर अधिक यशस्वी झाले असून या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व अधोरेखित : कार्यक्रमात डॉ. यशवर्धन पाटील, डाक अधिकारी अमित देशमुख आणि उमेश मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करत रक्तदानाचे सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर केंद्रे यांनी केले.
रक्तदात्यांचा प्रमाणपत्राने सन्मान : या उपक्रमानिमित्ताने रक्तदात्यांना वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड यांच्यावतीने प्रमाणपत्र वितरित करून सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे कराड डाक विभागाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
