कन्यागत पर्वकाळाच्या नियोजनास सुरुवात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

‘कराड कन्यागत उत्सव मंडळा’ची स्थापना; २०२७-२८ मधील पर्वासाठी व्यापक नियोजन 

कराड/प्रतिनिधी : –

येणाऱ्या २०२७-२८ साली गुरुचे कन्या राशीत होणारे संक्रमण लक्षात घेता, कन्यागत पर्वकाळाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे व्यापक नियोजन सुरू करण्यात आले आहे. या निमित्ताने ‘कराड कन्यागत उत्सव मंडळा’ची स्थापना करण्यात आली असून, भविष्यातील पर्वकाळ अधिक प्रभावी आणि सुयोजित पद्धतीने साजरा करण्याचा मानस मंडळाने व्यक्त केला आहे.

उत्सव मंडळाची स्थापना : कन्यागत पर्वासाठी विशेष उपक्रम राबवण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या कन्यागत उत्सव मंडळा’च्या कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी विश्वनाथ के. जोशी, उपाध्यक्ष घनःश्याम त्र्यं. पेंढारकर, सचिव विनायक मो. गरुड, खजिनदार जयंत द. बेडेकर, तर सदस्यपदी विजय पां. वाटेगांवकर, सौरभ अ. पाटील, सचिन रा. गरुड, शौर्याशील सो. खामकर व परशुराम अ. डवरी यांचा समावेश आहे.

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : मंडळाच्या माध्यमातून येत्या कन्यागत पर्वात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये स्नानविधी, महापूजा, गंगापूजन, श्राद्ध विधी, तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांचा समावेश असेल.

वैदिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले तीर्थक्षेत्र : कराड हे प्राचीन काळापासून वैदिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले तीर्थक्षेत्र आहे. पूर्वीच्या कन्यागत पर्वकाळात येथे देशभरातून भाविक आले होते. त्याच धर्तीवर, यंदा देखील अधिक प्रभावी व नियोजनबद्ध स्वरूपात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक ओळखीचा प्रचार आणि जपणूक : मंडळामार्फत पुढील काळात कृष्णा नदी व घाटांचे संवर्धन, स्वच्छता, अष्टतीर्थांचा विकास, तसेच कराडच्या सांस्कृतिक ओळखीचा प्रचार आणि जपणूक यासाठी विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. या पर्वकाळात अधिकाधिक नागरिक, स्वयंसेवक व संस्थांनी सहभाग घ्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. संयुक्त प्रयत्नांतून कराडचा अध्यात्मिक वारसा अधिक प्रभावीपणे उजळून निघेल, असा विश्वासही मंडळाने व्यक्त केला आहे.

कृष्णा नदीमध्ये गंगेचे आगमन 

भारतीय धार्मिक परंपरेनुसार, जेव्हा गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा कन्यागत पर्वकाळ आरंभ होतो. या काळात कृष्णा नदीमध्ये गंगेचे आगमन होते, असे मानले जाते. यामुळे कृष्णा तीरावरील स्नान, गंगापूजन, श्राद्ध विधी आणि इतर धार्मिक कृतींना अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद असे स्थान प्राप्त होते. हजारो भाविक या पर्वकाळात कराडला भेट देतात. यामुळे या काळाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध असणे गरजेचे ठरते. यादृष्टीने उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!