
कराडमध्ये ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा; परिसर झाला शिवमय, स्वराज्य स्थापनेच्या स्मृतींना उजाळा
कराड/प्रतिनिधी : –
ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या कराडनगरीत ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा सोमवारी (दि. ९ जून) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी, श्री शिवतीर्थ दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वेदमंत्रांच्या गजरात प्रतीकात्मक शिवमूर्तीचा अभिषेक करण्यात आला. यावेळी झालेल्या शिवघोषांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
श्री शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजन : हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा शिवराज्याभिषेक सोहळा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कराड यांच्या वतीने दरवर्षी तिथीप्रमाणे साजरा केला जातो. यंदाही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी, सोमवारी (दि. ९) जून रोजी सकाळी ७.४५ वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली.
वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत अभिषेक : सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते प्रतीकात्मक शिवमूर्तीस वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ११ दाम्पत्यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले.
पारंपारिक पोशाखात सहभाग : याप्रसंगी पारंपरिक पोशाखात महिला, युवक, युवती आणि विविध वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसह कराड व मलकापूर शहर, तसेच परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला.
शिवघोषांनी दणाणला परिसर : “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “धर्मवीर संभाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी”, “भारत माता की जय” अशा जयघोषांनी संपूर्ण शिवतीर्थ परिसर दणाणून गेला.
शिवतीर्थ झाले शिवमय : या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ परिसर आकर्षक भगव्या पताकांनी, फलकांनी आणि पारंपरिक सजावटीने सजवण्यात आला होता. विविध ठिकाणी रांगोळ्या आणि फुलांची आरास करण्यात आली होती. या साऱ्या सजावटीमुळे शिवतीर्थ परिसर संपूर्णपणे शिवमय झाला होता.
शहराच्या सांस्कृतिक जाणीवेचे प्रतीक : या वर्षीही नागरिकांनी हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि साजशृंगारात साजरा केला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्मृतींना उजाळा देत नव्या पिढीसमोर इतिहासाची उजळणी करून देणारा हा सोहळा कराड शहराच्या सांस्कृतिक जाणीवेचे प्रतीक ठरला आहे.
आज दुपारी पालखी सोहळा व देवदर्शन यात्रा : आज सोमवार (दि. ९) जून रोजी दुपारी ४.३० वाजता शिवतीर्थ दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून त्यानंतर शिवरायांचा पालखी सोहळा आणि शहरातून देवदर्शन यात्रा काढण्यात येणार आहे. हा एकत्रिकरण समारंभ पारंपरिक वाद्यवृंदाच्या उपस्थितीत भव्यतेने पार पडणार असून यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पारंपरिक पोशाखात, भगवा फेटा व पंढरी टोपी घालून सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
