निसर्ग ग्रुप, कराडचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प; वृक्षारोपणाच्या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक
कराड/प्रतिनिधी : –
जखिणवाडी-मलकापूर (ता. कराड) परिसरातील आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या वतीने पक्षीतीर्थ स्थापन करण्यात आले असून, याच परिसरात रविवारी ‘निसर्ग ग्रुप, कराड’ तर्फे विविध देशी वृक्षप्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
देशी व बहुउपयुक्त झाडांचे रोपण : वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत उंबर, करंज, फणस, पिंपळ आणि चिंच या देशी व बहुउपयुक्त झाडांचे रोपण करण्यात आले. निसर्ग ग्रुपकडून याआधी लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनासाठी आळी करून त्यांना अधिक पाणी मिळण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली.
मातीतील सेंद्रिय घटक वाढवण्याचा प्रयत्न : यावेळी सर्व झाडांना जीवामृत मिश्रित पाणी टाकण्यात आले. जेणेकरून झाडांची वाढ सशक्त होईल व मातीतील सेंद्रिय घटक वाढून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, या उद्देशाने झाडांसाठी जीवामृत मिश्रित पाण्याचा वापर करण्यात आला.
पक्षीतीर्थात स्वच्छ पाणीसाठा : सध्या आगाशिव डोंगर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने संपूर्ण परिसरात हिरवळ पसरली आहे. वनविभागाने तयार केलेल्या पक्षीतीर्थात आता स्वच्छ पाणीसाठा तयार झाला असून, या नैसर्गिक वारशाचा लाभ स्थानिक जैवविविधतेला होतो आहे. परिसरात पर्यावरणपूरक बदल : निसर्ग ग्रुपकडून यापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांची वाढही समाधानकारक असून परिसरात पर्यावरणपूरक बदल दिसून येत आहेत. याबद्धल सर्व उपस्थित निसर्गसेवकांनी समाधान व्यक्त केले.
यावर्षीचा निर्धार : या उपक्रमानिमित्त निसर्ग ग्रुपच्या सदस्यांनी २०२५ या वर्षात आणखी किमान ५० झाडे लावण्याचा निर्धार केला. आतापर्यंत या संकल्पात चाफा, उंबर, बहावा, काटेसावर, पिंपळ, आवळा, बेल, करंज, फणस, चिंच आदी प्रजातींच्या झाडांचे एकूण १७ रोपे लावण्यात आली असून, पुढील काळात उपलब्ध असलेल्या इतर स्थानिक प्रजातींचेही वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
निसर्गसेवकांचा सहभाग : या हरित उपक्रमात सौ. शशिकला शिर्के, विक्रम झरेकर, सुरेश शिर्के, विजय वाडेकर, संग्राम कुंभार, मनोहर पवार, योगेश पाटील, दिपक रायबागी आदी निसर्ग सेवकांनी सहभाग घेतला.
निसर्गाच्या सान्निध्यात अल्पोपहाराचा आनंद : वृक्षारोपणानंतर सर्व सदस्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात एकत्रितपणे अल्पोपहाराचा आनंद घेत परस्परांमध्ये पर्यावरणविषयक चर्चा केली.
नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता : निसर्ग ग्रुपचा हा उपक्रम सामाजिक भान आणि पर्यावरणप्रेमाचे उत्तम उदाहरण असून, स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करणारा ठरतो आहे. त्याबद्धल निसर्ग ग्रुप, कराडच्या वृक्षारोपण या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.
