शिवसृष्टी राज्यात आदर्श शक्तीस्थान ठरेल – शंभूराज देसाई; पुतळे सुशोभीकरण व अन्य विकासकामांचे भूमिपूजन
कराड/प्रतिनिधी : –
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून व शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या
कराडमधील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व शहरातील अन्य स्मारकांच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. कराडच्या शिवतीर्थ दत्त चौकात उभा राहणारी शिवसृष्टी राज्यात आदर्श शक्तीस्थान म्हणून आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वासही ना. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
भूमिपूजन : भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.
भव्य स्मारकासाठी पाठपुरावा : सुमारे तीस वर्षांपूर्वी १९९६ साली दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा परिसर शिवतीर्थ म्हणून ओळखला जात असून राजेंद्रसिंह यादव यांनी या परिसरात भव्य स्मारकासाठी पाठपुरावा केला होता. यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून भव्य असे स्मारक निर्माण होणार आहे.
शिवतीर्थासाठी पाच कोटी : याप्रसंगी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी रुपयांचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने मंजूर झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन आज स्थानिक आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले.
कराडसाठी निधी कमी पडणार नाही : महायुतीच्या माध्यमातून कराडसाठी कोणताही निधी कमी पडणार नाही, याची आम्ही सातत्याने ग्वाही दिली आहे. राजेंद्र यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंजूर केलेल्या या शिवसृष्टीचा विकास राज्याभरात आदर्श नावलौकीक मिळवेल. यापुढेही शहरात कोणत्याही स्वरूपाचा निधी आम्ही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महायुती कराडच्या विकासासाठी तत्पर : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून राजेंद्रसिंह यादव यांनी शिवतीर्थ दत्त चौकात शिवसृष्टी उभा करण्याची संकल्पना मांडली. त्याला पाच कोटींचा निधी मंजूर झाला आला असल्याचे सांगत आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले, महायुतीच्या काळातच त्याचे काम होत आहे. यापुढेही महायुती एकसंघपणे प्रत्येक विकासकामासाठी तत्पर राहील. यापुर्वी आणि आत्ताची सत्ता स्थापन झालेली महायुती कराडच्या विकासासाठी तत्पर राहील, याची खात्री असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
…या कामांचे झाले भूमिपूजन : दरम्यान, बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, महात्मा फुले पुतळा सुशोभीकरण, अण्णाभाऊ साठे स्मारकाचे, संविधान स्तंभाचेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच शुक्रवार पेठेतील जुने जलशुद्धीकरण केंद्रातील जागेत मराठा समाज मंदिर, डवरी समाज मंदिर व स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संगीता देसाई, माजी नगरसेवक विनायक पावसकर, विजयसिंह यादव, हणमंत पवार, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, विद्या पावसकर, गजेंद्र कांबळे, ओमकार मुळे, निशांत ढेकळे, सुहास जगताप, विनोद भोसले, अरुणा पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माने, सुलोचना पवार, रणजीत पाटील , काकासाहेब जाधव, चंद्रकांत जिरंगे, सागर आमले, प्रमोद वेर्णेकर, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व विविध संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
