कराडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
कराड/प्रतिनिधी : –
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या कराडमधील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व अन्य स्मारकांच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन रविवारी (दि. १) जून रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास आमदार डॉ. अतुल भोसले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह शहरातील माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती असणार आहे.
पाच कोटींचा निधी मंजूर : शिवतीर्थ दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
…या पुतळ्यांचेही होणार सुशोभीकरण : याबरोबरच बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, महात्मा फुले पुतळा सुशोभीकरण, अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजनही होणार आहे. तसेच शुक्रवार पेठेतील जुने जलशुद्धीकरण केंद्रातील जागेत मराठा समाज मंदिर, डवरी समाज मंदिर व स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजनही या दिवशी होणार आहे.
राजेंद्रसिंह यादव यांनी आणला निधी : या कार्यक्रमास यशवंत विकास आघाडीचे सर्व माजी नगरसेवक, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती असणार आहे. राजेंद्रसिंह यादव यांनी महायुती शासनाकडे पाठपुरावा करून या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये शिवसेना मेळावा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची तयारी सुरू आहे. या अनुषंगाने रविवारी १ जून रोजी दुपारी १२ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे व शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
