कराड/प्रतिनिधी : –
“कॅन्सर झाला हे समजताच जीव घाबरला होता. पण कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉ. सुरेश भोसले यांच्या रुपात साक्षात देव भेटला,” अशा भावोत्कट शब्दांत कॅन्सरमुक्त झालेल्या महिलांनी आपली कृतज्ञता व्यक्त करत डॉ. सुरेश भोसले यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.
कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठक : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आणि प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांनी कथन केला जीवन संघर्ष : यावेळी उपचाराने कॅन्सरवर मात केलेल्या महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष कथन करत डॉ. भोसले यांनी दिलेल्या वैद्यकीय आणि मानसिक आधाराचे स्मरण केले. “कृष्णा हॉस्पिटल म्हणजे आमच्यासाठी मंदिर आहे आणि सुरेशबाबा हे त्या मंदिरातील देव आहेत,” असेही मत अनेकांनी व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी राज्याचे माजी क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. सुवर्णादेवी देशमुख, डॉ. विजय कणसे, डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकारात्मक दृष्टीकोन ठेवा : कॅन्सरचे निदान झाल्यानंतर रुग्ण नैराश्यात जात असल्याचे सांगत यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज वेळेवर निदान व उपचार केल्यास रुग्ण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यामुळे रुग्णांनी भीती न बाळगता सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.”
स्वागत : कार्यक्रमाचे स्वागत डॉ. प्रणिता पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्य नर्सिंग ऑफिसर रोहिणी बाबर यांनी केले. तर डॉ. सुजाता कानिटकर यांनी आभार मानले.
