भाजपाने दिलेली जबाबदारी कामाची पोचपावती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अ‍ॅड. भरत पाटील; पश्चिम महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न

कराड/प्रतिनिधी : –

दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत गेल्या ३० वर्षांपासून मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एका वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. अशात पक्षाने कामाची दखल घेऊन मोदींच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली, हे माझे भाग्य असून ही खर्‍या अर्थाने माझ्या कामाची पोच पावती असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे (NMDC) संचालक अ‍ॅड. भरत पाटील यांनी केले.

अभिवादन : भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या (NMDC) संचालकपदी अ‍ॅड. भरत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे प्रथमच कराडमध्ये बुधवारी आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सौ. स्वाती पिसाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘देर है मगर अंधेर नही’ : ३० वर्षांपासून काम करताना अनेकदा सहकार्‍यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, भारतीय जनता पार्टीत ‘देर है मगर अंधेर नही’, असे सांगत अ‍ॅड. पाटील म्हणाले, या मिळालेल्या संधीचे चीज करणार आहे. 

प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला न्याय : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करीन. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिलेली संधी, ही सातारा जिल्ह्यातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कामाचे स्वरूप : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या (NMDC) कार्यपद्धतीबाबत बोलताना ते म्हणाले, हे महामंडळ केंद्र सरकारच्या अधिकारातील असून जमिनीच्या खाली लोह, दगडी कोळसा, हिरे, सोने, चांदी आदी प्रकारचे जेवढे धातू आहेत, त्यांचे उत्खनन करणे, त्यांवर प्रक्रिया करणे आणि त्यांची बाजारपेठेत विक्री करणे या पद्धतीचे काम या संस्थेमार्फत होते. तसेच नवीन खाणींवर संशोधन करण्याचे कामही या केले जाते. NMDC हे केंद्र सरकारच्या सर्वात मोठ्या नवरत्न कंपन्यांपैकी चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीवर बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पक्षातर्फे माझी नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत देशभरातील विविध खनिजांच्या उत्खनन करणार्‍या कंपन्यांमार्फत देशाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, या प्रकारची भूमिका सदर कंपनीची असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्राला न्याय देण्याचा माझा प्रयत्न : या महामंडळाच्या पदावर काम करताना पश्चिम महाराष्ट्रासाठी काही खास नियोजन केले आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच आपण या पदावर रुजू झालो आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील खाणींच्या संदर्भात अधिक माहिती घेऊन नक्कीच याबाबतचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर जिल्हा व गोव्याच्या अनेक ठिकाणी बॉक्साइटच्या खाणी आहेत. या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या खनिजांचे उत्खनन करून त्याचे धातूंमध्ये रूपांतर केले जाते. अशा खाणींच्या संदर्भात काय करता येईल, याचा आढावा घेऊन पश्चिम महाराष्ट्राला न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!