कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार, राज्यभरात मंडल स्तरावर सुरु करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ या विशेष मोहिमेअंतर्गत कराड तालुक्यातील शेणोली मंडळातील वडगाव हवेली येथे दि. २५ रोजी उत्साहात पार पडले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.
शासकीय कामांची तत्काळ पूर्तता : सदर शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या शिबिरात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी थेट ग्रामस्थांच्या भेटीस येऊन त्यांच्या शासकीय कामांची तत्काळ पूर्तता केली.
मान्यवरांची उपस्थिती : या शिबिरात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, कृष्णा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, सरपंच राजेंद्र जगताप, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह मंडलातील महसूल अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४७० प्रकरणांवर जागेवरच कार्यवाही : या एकदिवसीय शिबिरात नागरिकांच्या विविध प्रकारच्या ४७० प्रकरणांवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली. यामध्ये गोपाळ समाजाचे जातीचे ४१, नॉन क्रिमीलेयर १०, उत्पन्नाचे ५५, रहिवासी दाखल्याचे ४३, इतर जातीचे ४ दाखले यांचा समावेश होता. तसेच १९५ प्रकरणांत ७/१२ उताऱ्यांवरील फेरफार व एकूण नोंदी करण्यात आल्या. लक्ष्मी मुक्ती योजनेच्या ३६ लाभार्थ्यांना मदत, वारस नोंदी ५० प्रकरणे, पीएम किसान केवायसी, एग्री स्टॅग नोंदणी प्रत्येकी ५ प्रकरणे, अ. पा. क. नोंदी ३, रेशनिंग कार्ड आणि इतर विभागांची २६ कामे आदी कामांचा निपटारा करण्यात आला.
विविध प्रमाणपत्रांचे गावातच वितरण : याप्रसंगी बोलताना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, कराड तालुक्यातील हे पहिलेच समाधान शिबिर असून, स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे गावातच वितरण करण्यात येणार आहे. या दृष्टीने शाळा व महाविद्यालयांनुसार नियोजन करण्यात आले आहे. तसेच पानंद रस्ते, सलोखा योजना, फेरफार नोंदी याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात केले.
नागरिकांच्या वेळ व खर्चाची बचत : प्रास्ताविकात तहसीलदार कल्पना ढवळे यांनी शासनाने सुरू केलेल्या या मोहिमेचा उद्देश म्हणजे नागरिकांना त्यांच्या गावातच सर्व सेवा उपलब्ध करून देणे हा असल्याचे सांगितले. तसेच अधिकारी गावातच येऊन काम पूर्ण करत असल्याने नागरिकांचा वेळ व खर्च वाचत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोगत : ग्रामस्थांच्या वतीने जगदीश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. विमुक्त व भटक्या जातीबाबत सौ. शैला यादव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी सुनील ताकटे यांनी, हेमंत बेसके यांनी आभार मानले.