कराड/प्रतिनिधी : –
राज्य शासनाच्या निर्णयानुसार कराड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ कराड प्रशासकीय कार्यालयात आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.
मोफत वाळूच्या पासेसचे वितरण : आमदार भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूच्या पासेसचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नायब तहसीलदार युवराज पाटील, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
येत्या पाच वर्षात तीन कोटी घरकुले : याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, राज्य शासनाने घरकुलासाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आज मोफत वाळू पासेस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 2014 ते 2024 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात तीन कोटी घरे दिली. अजून तीन कोटी घरकुले येत्या पाच वर्षात देण्यात येणार आहेत. म्हणजे वर्षाला ६० लाख घरे देशभरातील नागरिकांना मिळणार आहेत.
दक्षिणेतील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्नशील : महाराष्ट्राला २० लाख घरे देण्याचा निर्णय ना. अमित शहा यांनी घेतला. त्याचा फायदा कराड तालुक्यातील विशेषत: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांना जास्तीत जास्त कसा होईल, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यासाठी प्रशासनही तत्परतेने काम करत आहे. शासनाच्या या धोरणाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल, असे आमदार भोसले यांनी यावेळी सांगितले.
5 हजार 219 घरकुल लाभार्थी : कराड तालुक्यात एकूण 5 हजार 219 घरकुल लाभार्थी आहेत. सद्यस्थितीत चालू असलेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना तांबवे व किरपे येथील वाळू डेपोवरून वाळूचा पुरवठा करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.
इतर भागांतही शिबिर घेणार : पुढील काळात तालुक्यातील इतर भागांमध्येही अशा प्रकारचे शिबिर आयोजित करून लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सांगितले.
पुरुष, महिला लाभार्थ्यांची उपस्थिती : याप्रसंगी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घरकुल लाभार्थी पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.