कराड/प्रतिनिधी : –
कृष्णाकाठचे शांत, संयमी नेतृत्व आणि कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा ७० वा वाढदिवस ३० मे रोजी साजरा होत आहे. यानिमित्त दि. ३० व ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षणतज्ज्ञ व सहकारतपस्वी : आरोग्य, शिक्षण, सहकार, अर्थकारण, साखर उद्योग, पर्यावरण अशा विविधांगी क्षेत्रामध्ये अतुल्य योगदान देणारे आणि कृष्णाकाठी समृद्धीच्या दिशा विस्तारणारे नेतृत्व म्हणून डॉ. सुरेश भोसले यांना ओळखले जाते. प्रख्यात कर्करोग उपचार तज्ज्ञ, एक निष्णात सर्जन, ज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना देणारे शिक्षणतज्ज्ञ, सहकाराला नवसंजीवनी देणारे सहकारतपस्वी, साखर उद्योगाला विधायक दिशा देणारे नेतृत्व आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे पर्यावरणप्रेमी म्हणून डॉ. सुरेश भोसले यांनी त्या-त्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे.
अभिष्टचिंतन सोहळा व संगीतरजनी : डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजता मलकापूर येथे अभिष्टचिंतन सोहळा आणि भव्य संगीतरजनीचे आयोजन करण्यात आले आहे. मलकापूर-बैलबाजार रोडवरील श्री गणेश मंदिरामागील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवरांच्या उपस्थित होणार सोहळा : या अभिष्टचिंतन सोहळ्यात माजी राज्यपाल तथा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुरेश भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘सुरों का उत्सव’ : यादिवशी ‘सुरों का उत्सव’ या भव्य संगीतरजनीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नामवंत गायक ऋषिकेश रानडे, अमेय दाते, सागर केंदूरकर, गायिका कोमल कृष्णा, संपदा गोस्वामी हे बहारदार हिंदी व मराठी गीते सादर करणार आहेत.
भव्य शेतकरी मेळावा : याचबरोबर शनिवारी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य शेतकरी मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शेतकरी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आवाहन : मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी ए.आय. तंत्रज्ञान, ठिबक सिंचन याची माहिती देणारे स्टॉल्स् असणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले वाढदिवस सोहळा समितीने केले आहे.
हार-तुरे, भेटवस्तू न आणण्याचे आवाहन
या दोन्ही अभिष्टचिंतन सोहळ्यात मान्यवरांच्या शुभ हस्ते व सर्व लोकांच्या उपस्थितीत एकच भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येताना कुणीही हार, तुरे अथवा भेटवस्तू आणू नयेत, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.