कराड/प्रतिनिधी : –
काश्मीर येथील पेहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने दाखवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ रविवारी कराड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली.
सहभाग : भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत अबालवृध्दांनी सहभाग घेतला. भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनाही रॅलीत प्रशासकीय कार्यालयाजवळ आल्यानंतर सहभाग घेतला.
विजयस्तंभास अभिवादन : रविवारी सकाळी येथील विजय दिवस चौकातील विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करत या तिरंगा रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह माजी सैनिक, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, महिला, पोलीस, महसूल, पंचायत समिती, नगरपालिका आदींसह विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
विजय घोषणा : ‘सैनिकों के सन्मान में, हर भारतीय मैदान में’, ‘भारतमाता की जय’, वंदे मातरम् , ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत तिरंगा रॅली निघाली. ही रॅली विजय दिवस चौक येथून बस स्थानक समोरील रस्त्यावरून शिवतीर्थ दत्त चौकात पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयासमोर गेली. तेथे मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर ही रॅली विसर्जित झाली. या रॅलीत नागरिकांसह माजी सैनिकही सहभागी झाले होते.
सैनिक बांधवांप्रती अभिमान व आदरभाव : याप्रसंगी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पाकिस्तानने पाठवलेल्या अतिरेक्यांच्या माध्यमातून पेहलगाममध्ये निष्पाप लोकांची क्रूर हत्या झाली. त्यांना घरातल्यांसमोर धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. या अत्यंत निंदनीय प्रकाराविरोधात मोठी संतापाची लाट होती. त्याचे प्रत्त्युत्तर चोख भारतीय सैन्यांने दिले. त्यात पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याचे काम आपल्या सैनिक बांधवांनी केले. त्याबद्दल सैनिकांप्रती अभिमान व आदरभावना दाखविण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे भारत बददला आहे, हाच संदेश भारतीय सैन्याने दिला आहे. त्यानिमित्ताने त्यांचे आभार व अभिमान दाखविण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वीर जवानांचे स्मरण : भारतीय जवानांच्या समर्थनार्थ येथे तिरंगा रॅली काढण्यात आल्याचे संगत आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले, कराड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सैनिकांनी सेनेत कामगिरी बजावली आहे. असंख्य मुले आजही सैन्यात व सीमेवरही सेवा बजावत आहेत. निवृत्त सैनिकांसह देशसेवा करणाऱ्यांना घेवून आम्ही तिरंगा यात्रा काढली. त्यात मोठा उत्साह होती. ऑपरेशन सिंदुरमध्ये ज्या वीर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सैनिकांचे आम्ही येथे स्मरण केले. ऑपरेशन सिंदुरनंतर भारताच्या रक्षणासाठी ज्या काही उपाय योजना केल्या, त्याचे आम्ही या रॅलीव्दारे समर्थन करत आहोत.
भारत मजबूत असल्याचा जगभरात संदेश : भ्याड दहशतवादी कृत्ये करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवताना भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य गाजविले आहे, असे सांगत आमदार मनोज घोरपडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत देश मजबूत असल्याचा संदेश जगभर गेला आहे. संपूर्ण देश भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.