सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. मनोजदादा घोरपडे; साप येथे जनता दरबार उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य लोक अतिशय आशेने माझ्याकडे येतात. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल असलेला विश्वास बघून काम करण्यास अजून ऊर्जा मिळते. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घट्ट आणि अतूट असं माझ्या जनतेसोबतच हे नातं वृध्दींगत होत चालले आहे, याचे निश्चितच समाधान आहे. जनता दरबाराद्वारे सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील, अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

जनता दरबार : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील जनतेसाठी साप गावात शनिवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून आमदार घोरपडे यांनी लोकांच्या भेटीगाठी घेऊन समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख उपस्थित होते.

महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश : प्रांताधिकारी नाईक यांनी कोरेगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेत सोडविण्याबाबत थेट आदेश महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

कार्यवाहीच्या सूचना : सर्वसामान्य लोकांनी जनता दरबारामध्ये थेट आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे विविध मागण्या करत निवेदने सादर केली. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्या, अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार घोरपडे यांनी दिल्या. यावेळी शिधाकार्ड वाटप, श्रावणबाळ पेंशन योजनेतील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

90 तक्रारींचा निपटारा  : या दरबारात एकूण 150 तक्रारी आल्या. त्यातील 90 तक्रारी जागेवर सोडवण्यात आल्या. उर्वरित तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या. यावेळी वासुदेव माने, तुषार जाधव, तात्यासो साबळे, सागर गायकवाड, नागेश अडसूळ, भगवान कदम, रणजीत माने, सोमनाथ निकम, राजेंद्र मोरे, ऋषिकेश तुपे, ज्ञानेश्वर कदम आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!